Construction Waste Pudhari
पुणे

Kharadi Debris Dumping: खराडीतील झेन्सर मैदानावर राडारोडा डम्पिंगचा आरोप; महापालिका ठेकेदारावर कारवाईची मागणी

महापालिकेचे स्टिकर असलेल्या डंपरमधून दिवसाला १५ ते २० फेऱ्या; मैदानावर ५ ते ६ फूट उंच राडारोड्याचे ढिगारे

पुढारी वृत्तसेवा

येरवडा: 'स्वच्छ पुणे, सुंदर पुणे'ची महापालिकेची जाहिरातबाजी एकीकडे सुरू आहे आणि दुसरीकडे महापालिकेचाच ठेकेदार खराडीच्या मध्यवस्तीतील झेन्सर मैदानावर भर दिवसा राडारोडा टाकत असल्याने संताप व्यक्त होत आहे. सार्वजनिक ठिकाणी भर दुपारी राडारोडा टाकला जात आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय ठेकेदार हे धाडस करूच शकत नाही, असा आरोप नागरिक करीत आहेत.

खराडी-चंदननगर भागातील झेन्सर कंपनीच्या भव्य मैदानावर हजारो खराडीकर, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले येथे सकाळ-संध्याकाळ फिरायला, खेळायला येतात. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून याच मैदानावर महापालिकेचे स्टिकर लावलेले डंपर येत आहेत आणि टनाने बांधकामाचा राडारोडा, माती आणि कचरा टाकत आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार महापालिकेच्या एका अधिकृत ठेकेदाराकडून सुरू आहे. दिवसाला १५ ते २० डंपर हा राडारोडा याठिकाणी आणून ओतत आहेत. यामुळे मैदानाचा मोठा भाग आता ५ ते ६ फूट उंच राडारोड्याच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला आहे.

या बेकायदा डम्पिंगमुळे संपूर्ण परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. सकाळी फिरायला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना श्वास घेणेही कठीण झाले आहे. पावसात हा राडारोडा वाहून जाऊन चेंबर तुंबत आहेत, तर उन्हात दुर्गंधीने नाक बंद करून चालावे लागत आहे. महापालिका लाखाे रुपये खर्चून स्वच्छतेचे ब्रँडिंग करते, पण हा ठेकेदार या मैदानाला कचराकुंडी बनवत असल्याची भावना रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

ठेकेदाराला काळ्या यादीत टाका

या प्रकाराबाबत सामाजिक कार्यकर्ते संतोष भरणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 'हा प्रकार म्हणजे पर्यावरणाचा खून आहे. कोट्यवधींच्या मैदानाची अशी विल्हेवाट लावणाऱ्या ठेकेदाराला पाठीशी कोण घालतंय? आयुक्तांनी याची गंभीर दखल घेऊन संबंधित ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ काळ्या यादीत टाकावे; अन्यथा खराडीकर रस्त्यावर उतरतील,' असा इशाराही भरणे यांनी दिला आहे.

अधिकाऱ्यांची नेहमीची सारवासारव

या गंभीर प्रकाराबाबत आरोग्य अधिकारी शिवाजी शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत बोलण्यास टाळाटाळ केली. 'मला याबाबत माहिती नाही, मी जागेवर पाहणी करून योग्य ती कारवाई करेन,' असे ठरले उत्तर त्यांनी दिले.

अधिकाऱ्यांना हे कसे दिसत नाही?

डंपरमध्ये भरून भर दिवसा मैदानावर राडारोडा टाकला जात असताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हे कसे दिसत नाही की यामागे अधिकाऱ्यांचेच 'अर्थपूर्ण' संबंध आहेत? तसेच अधिकारी पाहणीच्या नावाखाली वेळकाढूपणा करून करीत असून, हा पुरावे नष्ट करण्याचा डाव नाही ना? असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. महापालिकेच्या आयुक्तांनी या गंभीर प्रकारची दखल घेण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT