Navale Hospital Pudhari
पुणे

Kashibai Navale Hospital Salary: काशीबाई नवले रुग्णालयातील डॉक्टर-कर्मचाऱ्यांचे नऊ महिन्यांचे वेतन थकीत; दिवाळीपूर्वी आंदोलन

थकीत वेतनासाठी कामगार संघटनेचे तीव्र आंदोलन; आठवडाभरात वेतन न मिळाल्यास आमरण उपोषण आणि मोर्चाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गेल्या नऊ महिन्यांपासून वेतन थकल्याने श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज आणि जनरल हॉस्पिटलमधील डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांवर दिवाळसणाच्या तोंडावर उपासमारीची वेळ आली आहे. थकीत वेतन मिळावे, या मागणीसाठी भारतीय कामगार कर्मचारी महासंघातर्फे रुग्णालयात सोमवारी तीव्र आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, पुढील आठवडाभरात वेतन मिळाले नाही, तर आमरण उपोषण, साखळी उपोषण, घोषणाबाजी आणि मोर्चा अशा मार्गांनी कायद्याच्या चौकटीत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महासंघातर्फे देण्यात आला आहे. तसेच आंदोलनामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, औद्योगिक शांतता बिघडल्यास किंवा दैनंदिन कामकाजावर परिणाम झाल्यास त्याची जबाबदारी व्यवस्थापनाची असेल, असे संघटनेचे अध्यक्ष दिलीप जगताप आणि सचिव आमदार भाई जगताप यांच्या नावाने पत्रक काढून मुख्यमंत्र्यांसह, आरोग्य मंत्री आणि स्थानिक प्रशासकीय संस्था, व्यवस्थापन विभागाकडे पाठवले आहे.

श्रीमती काशीबाई नवले रुग्णालयात आरोग्यसेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच आता जगण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. थकीत वेतन तातडीने देण्याचा औद्योगिक न्यायालयाचा आदेश असतानाही व्यवस्थापनाकडून त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत कामगार संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

या वेळी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न केवळ आर्थिक अडचणीपुरता मर्यादित राहिलेला नसून, त्याचे गंभीर सामाजिक परिणाम समोर येत आहेत. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून, मुलांच्या शिक्षणावरही त्याचा परिणाम होत असल्याचे संघटनेने व्यवस्थापनाला पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. नियमित वेतन मिळत नसल्यामुळे घरखर्च भागविणे, भाडे भरणे, जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे आणि इतरांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे अशक्य झाल्याचे संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या वर्षीचे वेतन रखडले असताना असेच आंदोलन करावे लागले होते. त्यानंतर जानेवारी महिन्यात थकीत वेतन मिळाले. मात्र, फेब्रुवारी महिन्यापासून आजतागायत वेतन थकीत आहे. वेतनाअभावी काही कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक कर्मचारी देशोधडीला लागले असून याबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा.
प्रतिभा नलावडे, खजिनदार, भारतीय कामगार कर्मचारी महासंघ, श्रीमती काशीबाई नवले हॉस्पिटल, पुणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT