

पुणे: तामिळनाडूचा मुख्यमंत्री असल्याचे भासवून सायबर चोरट्यांनी महिलेला गुडघ्याच्या ऑपरेशनसाठी मदतीचा बहाणा केला. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादित करून तब्बल २६ लाख ३० हजार रुपये ऑनलाईनरित्या गंडा घातला आहे.
ही घटना १० ऑक्टोबर २०२६ रोजी फुरसुंगीत घडली आहे. याप्रकरणी ५० वर्षीय महिलेने फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाईलधारक, लिंकधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार महिला फुरसुंगीत राहायला असून, १० ऑक्टोबरला सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. आपण तामिळनाडूचे मुख्यमंत्री असून, तुमच्या गुडघ्याच्या ऑपरेशनासाठी मदत करतो, अशी बतावणी केली. सायबर चोरट्यांनी महिलेचा विश्वास संपादित केल्यानंतर त्यांना विविध प्रकारचे टॅक्स भरावे लागतील, असे सांगितले.
टॅक्सच्या नावाखाली तब्बल २६ लाख ३० हजार रुपये वर्ग करण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने फुरसुंगी पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक राजेश खांडे तपास करत आहेत.