पुणे : एरंडवणे भागात एका ज्येष्ठ महिलेच्या सदनिकेतून दोन लाख रुपयांच्या बांगड्या चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत ज्येष्ठ महिलेने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अलंकार पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
एरंडवणे भागातील अर्चनानगर सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ महिलेने शयनगृहातील टेबलावर दोन लाख रुपयांच्या साेन्याच्या बांगड्या ठेवल्या होत्या. चोरट्यांनी दोन लाख रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. ज्येष्ठ महिलेच्या घरात चोरी करणारा चोरटा माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी सोसायटीत कामानिमित्त येणाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. पोलिस उपनिरीक्षक महेश निंबाळकर तपास करीत आहेत.
पुणे : सोसायटीत सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या एकाच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख ९९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना सोमवार पेठेत घडली. याबाबत रखवालदार अंकित धोजबहादूर कुंदर (वय २७) याने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, कुंदर कुटुंबीय सोमवार पेठेतील लडकत पेट्रोल पंपाजवळ असलेल्या श्री महालक्ष्मी सोसायटीत रखवालदार म्हणून काम करतात. सोसायटीच्या तळमजल्यावर त्यांचे घर आहे. सोसायटीच्या आवारात श्री महालक्ष्मी मंदिर आहे. आवारात भाविकांची वर्दळ असते. १ डिसेंबर रोजी कुंदर कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी घराचे कुलूप ताेडले व कपाटातून दोन लाख ९९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.
पुणे : चोरट्यांनी एका सदनिकेतून दोन लाखांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना धनकवडी भागातील चैतन्यनगर सोसायटीत घडली. याबाबत सहकारनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे धनकवडीतील चैतन्यनगर सोसायटीत राहायला आहेत. त्यांच्या सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी आत प्रवेश केला. सदनिकेतून दोन लाख एक हजार रुपयांचे दागिने चोरून चोरटा पसार झाला. पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार तपास करीत आहेत.