पुणे: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा (आयटीआय) दर्जा उंचाविण्यासाठी दक्ष प्रकल्पांतर्गत राज्यातील 54 आयटीआयची ‘दक्ष आयटीआय’ म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यात अमरावती आणि पुणे विभागातील प्रत्येकी आठ, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर या विभागातील प्रत्येकी दहा, नाशिक विभागातील सात संस्थांचा समावेश आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाने याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. राज्यात दक्ष हा प्रकल्प 5 फेबुवारीपासून कार्यान्वित झाला आहे. ‘हब अँड स्पोक्स क्लस्टर मॉडेल’अंतर्गत देशभरातील ‘आयटीआय’चा दर्जा उंचाविण्यासाठी ‘पीएम-सेतू’ ही योजनाही सुरू करण्यात आली आहे. तसेच, राज्यातील शासकीय ‘आयटीआय’च्या विकासासाठी ‘आशियाई विकास बँके’कडून ‘महादृष्टी’ प्रकल्प भविष्यात प्रस्तावित आहे.
या तिन्ही योजनांच्या माध्यमातून राज्यातील शासकीय ‘आयटीआय’चा दर्जा उंचाविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर, दक्ष प्रकल्पांतर्गत राज्यातील शासकीय ‘आयटीआय’ची निवड करण्यासाठी जागतिक बँकेच्या साहाय्याने व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने ‘औद्योगिक प्रशिक्षण संस्था क्रमवारी आराखडा’ तयार केला. त्यात संस्थात्मक क्षमता, प्रशासन, शिक्षण, सक्षमीकरण, पर्यावरण, उद्योग सहभाग, विद्यार्थी समर्थन, प्रगती, समता, समावेशन, प्रशिक्षण आणि निकाल अशा 89 निकषांचा समावेश आहे. या निकषांसह प्रादेशिक समानतेचा विचार करून उत्तम आणि मध्यम श्रेणीतील 54 शासकीय ‘आयटीआय’ची निवड करण्यात आली आहे.
निवड केलेल्या 54 शासकीय ‘आयटीआय’पैकी अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांतील प्रत्येकी दोन, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील प्रत्येकी एक, छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांतील प्रत्येकी एका संस्थेचा समावेश आहे.
‘दक्ष’मधून नेमके साधणार काय?
दक्ष प्रकल्पातून प्रामुख्याने पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, उद्योगकेंद्रित अभ्यासक्रम, प्रारूप आयटीआयची निर्मिती, समावेशक संधी, विद्यार्थ्यांना प्लेसमेंट आणि शिकाऊ उमेदवारी (ॲप्रेंटीसशिप) व प्रशिक्षकांचा विकास करण्याचे उद्दिष्ट आहे.
पुणे जिल्ह्यातील दोन संस्थांचा ‘दक्ष’मध्ये समावेश
मुंबई विभागात मुंबई शहर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांतील प्रत्येकी दोन, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांतील प्रत्येकी एक, पुणे विभागांतर्गत पुणे, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येकी दोन, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील प्रत्येकी एक, नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर, नंदूरबार जिल्ह्यातील प्रत्येकी दोन, जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील प्रत्येकी एक, नागपूर विभागांतर्गत भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येकी दोन, तर नागपूर, गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येकी एक संस्था समाविष्ट केली आहे.
कौशल्य प्रशिक्षणासाठी निवड
समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांना कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगारक्षम करण्यासाठी नऊ शासकीय ‘आयटीआय’ची निवड करण्यात आली आहे. त्यात अमरावती जिल्ह्यातील मोझरी, नांदेड जिल्ह्यातील किनवट, पुणे जिल्ह्यातील माणिकडोह, चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, मुंबई उपनगरमधील चेंबूर, पालघर जिल्ह्यातील मोखाडा, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर, जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील शासकीय आयटीआयचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.