पुणे: पत्नीशी झालेल्या कौटुंबिक वादाच्या रागातून पतीने घरातील साहित्य पेटवून दिल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्ता परिसरातील सावित्रीबाई फुले वसाहतीत घडली. या आगीत घरातील गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले, तर तीन पाळीव मांजरांचा होरपळून मृत्यू झाला.
याप्रकरणी ३६ वर्षीय महिलेने पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या पतीची एका महिलेशी असलेली मैत्री तिला मान्य नव्हती. यावरून गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते.
दरम्यान, फिर्यादीच्या मुलाने वडिलांना संबंधित महिलेशी बोलताना पाहिले आणि ही बाब आईला सांगितली. त्यानंतर फिर्यादीने त्या महिलेशी जाब विचारल्याने संबंधित महिलेने आरोपीला फोन करून याबाबत सुनावले. याच कारणावरून ९ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला. संतापाच्या भरात आरोपीने घरातील साहित्याला आग लावली. आग भडकताच फिर्यादी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धावल्या.
मात्र, आगीत घरातील गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले. तसेच घरात असलेल्या तीन पाळीव मांजरांचा होरपळून मृत्यू झाला. घराला आग लागल्याची माहिती मिळताच परिसरातील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पाण्याच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली.
सुदैवाने या घटनेत फिर्यादी जखमी झाल्या नाहीत. आग लावल्यानंतर आरोपी पती घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुभाष महाले करत आहेत.