Bomb Threat File Photo
पुणे

Pune Hospital Bomb Threat Case: पुणे हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू ठेवून खंडणीचा डाव; ATS कडून आरोपीला अटक

उपचार खर्चामुळे आर्थिक अडचणीतून बनावट बॉम्ब ठेवून 8 लाखांची खंडणी मागण्याचा प्रकार उघड; आरोपी नागपूरमध्ये ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

पुणे: दुर्धर आजाराने ग््रास्त असल्याने व डॉक्टरांनी उपचारासाठी सात लाखांचा खर्च सांगितल्यामुळे त्यांच्याकडून खंडणी उकळण्यासाठी रुग्णालयात बॉम्बसदृश्य वस्तू ठेवल्याचा बनाव उघड झाला आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएसने) आरोपीला नागपूर येथून बेड्या ठोकल्या आहे. नागपूरमार्गे कोलकाता, नंतर नेपाळला पळून जाण्याच्या आधीच त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीने बॉम्बसदृश्य वस्तू यूट्यूब पाहून बनविल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिवाजी राम राठोड (वय 29, रा. जूना सोलापूर-मांजरी रोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हडपसर भागातील कामधेनू इस्टेटच्या मागील बाजूला असणाऱ्या खासगी रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील शौचालयात बुधवारी सायंकाळी बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली होती. त्यानंतर बॉम्बशोधक पथकाने बॉम्बसदृश्य वस्तू निकामी केल्याचा दावा केला होता. यानंतर गुरुवारी आरोपी राठोडला दहशतवादविरोधी पथकाने नागपूर रेल्वेस्थानकातून ताब्यात घेतले.

अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाला दहशतवादी कारवाई नाही. 10 मे रोजी आरोपी राठोडला दुर्धर आजार झाला होता. त्यासंबंधी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेला होता. त्यावेळी हॉस्पिटलच्या वतीने त्याला उपचारसाठी 7 लाख रुपये खर्च लागणार असल्याची माहिती दिली. तो आर्थिक अडचणीत असल्याने त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे बॉम्बसारखी वस्तू ठेवून हॉस्पिटलचालककडून 8 लाख रुपयांची खंडणी मागण्याचा त्याचा विचार होता.

रात्री अकरापर्यंत आरोपीच्या परिसरात फेऱ्या

आरोपी शिवाजी राठोड याने साधारण 5 ते सहाच्या दरम्यान हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवला होता. यानंतर तो एका सलूनच्या दुकानात गेला आणि दाढी करून आला. या घटनेची यानंतर तो घटनास्थळी आला. यावेळी त्याला पोलीस पोहोचल्याचे कळाले. या वेळी 11 वाजेपर्यंत तो आजूबाजूला फिरत होता. यानंतर तो घरी गेला. खंडणीचा डाव आखण्यासाठी केवळ 400 रुपयांत बनावट बॉम्ब बनविल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे

आरोपीच्या मांजरीतल्या घरी पथकांची धडक

अटक करण्यात आलेला आरोपी हा एका कपड्याच्या दुकानात कामाला होता. मूळचा तो सोलापूर येथील असून, पुण्यात मांजरीत तो एका छोट्याश्या खोलीत भाडेतत्त्वावर राहत होता. पोलिसांनी आरोपीच्या घराचा पत्ता मिळाल्यानंतर त्यांनी त्याचे घर गाठले. त्याच्याबाबत त्याच्या पत्नीला विचारले असता तो पंधरा मिनिटांपूर्वीच बाहेर पडल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तो बाहेर फिरायला जाणार असल्याचेही त्याच्या पत्नीने सांगितले.

दुकानदाराला ऑनलाईन पैसे पाठवून घेतली कॅश

बॉम्बसदृश्य वस्तू ठेवल्याच्या प्रकारानंतर गुरुवारी सायंकाळपर्यंत तो आरोपी हा पुण्यातच होता. त्याअगोदर त्याने एका दुकानदाराला मोबाईलवरून तीन हजार रुपये पाठवून दुकानदाराकडून तीन हजारांची रोख रक्कम घेतली. याच दरम्यान त्याने कोलकाता येथील हावडा येथील स्थानकाचे रेल्वे तिकीट काढले. तो त्याच्या नेपाळ येथील बहिणीकडे फिरण्यासाठी जात असताना त्याला नागपूर येथे ताब्यात घेण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT