

पुणे: कृषि विभागाच्या योजनांची माहिती, बीज प्रक्रिया, बियाणे उगवण क्षमता, बीबीएफ तंत्रज्ञानाच्या मोहिमांची संख्या वाढविणे हे आपले साध्य असता कामा नये. तर माहिती दिलेल्या तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात त्यांच्या शेतावर किती केला आहे, ड्रीपच्या योजनेतून खरोखरच खर्च कमी होऊन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले आहे काय? यासाठी शेतकऱ्यांकडे वारंवार जाऊन पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी अधिकाधिक गुणवत्तापूर्ण कामावर लक्ष केंद्रित करायला हवे, अशी अपेक्षा अशी अपेक्षा कृषी विभागाचे सचिव परिमल सिंग यांनी व्यक्त केल्या.
कृषि आयुक्तालयात शुक्रवारी (दि.15) त्यांनी खरीप हंगाम 2026 च्या अनुषंगाने गेली दीड महिना विभागाकडून सुरु असलेल्या नियोजनाचा आढावा त्यांनी दिवसभर घेतला. त्यावेळी त्यांनी विविध सूचनाही दिल्या आणि अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात नेमके काय कामकाज शेतकऱ्यांसाठी केले पाहिजे, याबद्दलच्या सूचनाही दिल्या.
यावेळी कृषि आयुक्त सूरज मांढरे यांच्यासह कृषि संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) सुनील बोरकर, कृषि विभागाचे फलोत्पादन संचालक अंकुश माने, विस्तार व प्रशिक्षण संचालक रफिक नाईकवाडी, प्रक्रिया व नियोजन संचालक विनयकुमार आवटे, सर्व विभागीय कृषि सहसंचालक तसेच ऑनलाईनद्वारे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी उपस्थित होते.
कृषि विभागाकडून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींचा निपटारा क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडून तत्काळ होत आहे काय? हे पाहून त्यांच्या अडचणींवर उपाययोजना अंमलात आणणे हे साध्य असले पाहिजे. त्यासाठी त्याला कोणत्या प्रशिक्षणाची गरज असल्यास त्यांच्या अडचणींचा निपटारा होण्यासाठी लक्ष केंद्रित करावे.
गुणवत्तापूर्ण संशोधन व विस्तार कार्य हे विभागाचे ध्येय असले पाहिजे. त्यासाठी एक सक्षम टीम म्हणून कामाला लागा, अशाही सूचना त्यांनी दिल्याची माहिती बैठकीनंतर अधिकाऱ्यांनी दिली.