Heatwave Alert Pudhari
पुणे

Pune Heatwave Impact: पुण्यात 40 अंशांचा कहर! पाणीसाठे आटले, बाजारपेठा ओस

उन्हाच्या तडाख्याने शेती, पाणी आणि व्यापारावर मोठा परिणाम

पुढारी वृत्तसेवा

पुणे: एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पुणे जिल्ह्याला उन्हाच्या तीव झळा बसू लागल्या आहेत. जिल्ह्याचा तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने नागरिकांच्या जीवाची लाही-लाही होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे केवळ जनजीवनच नाही, तर जलसाठे, शेती आणि व्यापारावर देखील याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत.

उन्हाच्या वाढत्या तीवतेमुळे धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे. पुणे जिल्ह्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरण साखळीत सध्या पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. यासह जिल्ह्यातील महत्त्वाची धरणे जसे की भाटघर, नीरा देवघर, गुंजवणी आणि चासकमान येथील पाणी पातळीतही कमालीची घट झाली आहे. अनेक धरणांनी तळ गाठायला सुरुवात केल्याने आगामी काळात पिण्याच्या पाण्याचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उन्हाचा सर्वाधिक फटका ग््राामीण भागातील शेतीला बसला आहे. कडक उन्हामुळे पिकांना पाणी देण्याच्या वेळेत बदल करावा लागत आहे. विहिरींच्या पाणीपातळीत घट झाल्याने फळबागा विशेषतः डाळिंब, द्राक्षे आणि केळीच्या बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी ओढाताण होत आहे. उन्हाच्या तीवतेमुळे पिकांची पाने करपत असून, उत्पादनात घट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

बाजारपेठांमध्ये शुकशुकाट

दुपारच्या सुमारास रस्ते ओस पडत असून, बाजारपेठांमधील वर्दळ पूर्णपणे थांबली आहे. उन्हामुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत असल्याने कापड मार्केट, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर व्यवसायांवर परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या विविध भागांत सध्या सुरू असलेल्या यात्रा-जत्रांमधील गर्दीही उष्णतेमुळे लक्षणीयरीत्या रोडावली आहे. दुपारी 12 ते संध्याकाळी 5 या वेळेत व्यापार अक्षरशः ‌’थंड‌’ असतो.

प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळी सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा वापर काटकसरीने करण्याच्या सूचना नगरपालिका आणि ग््राामपंचायतींना देण्यात आल्या आहेत. वाढत्या उष्णतेमुळे पशुधनाचीही काळजी घेणे आवश्यक झाले असून, तशा सूचना जिल्हा प्रशासनाने तालुका पातळीवर निर्गमित केल्या आहेत.

उष्माघातापासून असा करा बचाव

  • भरपूर पाणी प्या : तहान नसली तरी दर तासाला पाणी पीत राहा. लिंबू सरबत, ताक, शहाळे यांचा आहारात समावेश करा.

  • थेट ऊन टाळा : दुपारी 12 ते 4 या वेळेत विनाकारण घराबाहेर पडू नका. बाहेर जाताना डोक्याला टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा.

  • आहार : हलका आणि पचायला सोपा आहार घ्या. ताजी फळे खा.

उष्माघाताची लक्षणे: चक्कर येणे, मळमळणे किंवा खूप डोके दुखत असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
डॉ. वृषाली स्वामी, तज्ज्ञ फिजिशियन

वाल्हे आठवडे बाजारात दुपारी शुकशुकाट

वाल्हे (ता. पुरंदर) येथील मंगळवारच्या आठवडे बाजाराकडे दि. 14 रोजी कडक उन्हामुळे ग््रााहकांनी पाठ फिरवले दिसून आले. येथे मंगळवारी दुपारी बाजारात शांतता पसरली होते. ग््रााहकांविना व्यापारी व किरकोळ भाजी विक्रेते हवालदिल झाले होते. वाल्हे परिसरात महिन्यांपासून उन्हाची तीवता वाढत आहे. येथील किमान तापमान 39 अंशांपर्यंत पोहोचले आहे. या उन्हामुळे दुपारी घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत गाव परिसरात सर्वत्र शुकशुकाट दिसून येतो. उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने नागरिक घरातच राहणे पसंत करतात. वाल्हे आठवडे बाजारात परिसरातील वाड्या-वस्त्यांवरून नागरिक येतात. त्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल होते. भाजीपाला, शेतीशी निगडीत साहित्य, घरगुती वस्तू, खेळणी, खाद्यपदार्थांचे स्टॉल, कपडे, फळे, मसाल्याची दुकाने यांसह अन्य गोष्टींची दुकाने छोटे व्यापारी या बाजारात थाटतात. यंदा मात्र, उन्हाचा तडाखा वाढल्याने या बाजारावर परिणाम होत असल्याने व्यावसायिकांना आर्थिक फटका बसत आहे. सायंकाळी ऊन उतरल्यानंतर पाच ते सहा वाजेनंतर ग््रााहकांची बाजारात गर्दी होते. तर रात्री साडेसात वाजेनंतर दुकान आवरून घरी जाण्याची लगबग सुरू असते. त्यामुळे मिळेल त्या दरात भाजीपाला किंवा इतर मालाची विक्री करण्याची वेळ येत असल्याचे छोट्या व्यावसायिकांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT