

पुणे: कोरोनानंतर आता बर्ड फ्लूच्या महामारीची शक्यता वर्तविली जात असून, प्राण्यांच्या संपर्कात असणाऱ्यांना बर्ड फ्ल्यू होऊ शकतो, असे बोलले जात आहे. जागतिक तापमानवाढीमुळे झालेल्या बदलांमुळे हे सर्व होत आहे.
अशा परिस्थितीत आपण प्रत्येकाने याबाबत जागरुक होणे आणि काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असे आवाहन पक्षितज्ज्ञ डॉ. सतीश पांडे यांनी बुधवारी (दि.15) केले. जंगलात पेटणाऱ्या बहुतांश वनव्यांमागे मानवी कारणे असल्याचेही त्यांनी नमूद केले. ॲडव्हेंचर फाउंडेशनच्या वतीने निसर्गप्रेमींसाठी आयोजित वसंत वैभव व्याख्यानमालेत डॉ. पांडे बोलत होते. वसंतातील पक्षिवैभव आणि पक्ष्यांमध्ये नवीनच आलेल्या बर्ड फ्लूवरील संशोधन या विषयावर त्यांनी स्लाईड शोद्वारे विचार मांडले.
जागतिक तापमानवाढीमुळे नैसर्गिक चक्रात झालेले बदल ते सद्य:स्थितीबद्दल, तसेच नॅशनल वन हेल्थ मिशनबद्दल त्यांनी माहिती दिली. आज जागतिक तापमानवाढीमुळे पृथ्वीवरील इकोसि स्टिम बदलले आहे. यामुळे प्राणी जंगलातून बाहेर येतात आणि त्यामुळे माणसाशी त्यांच्याशी संपर्क वाढत आहे. आताच्या घडीला पक्ष्यांमध्येही अनेक आजार दिसून येत आहेत. अशा वेळी आम्ही बर्ड फ्लूबाबत संशोधन करीत आहोत, जागरुकता निर्माण करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
जागतिक तापमानवाढीमुळे नैसर्गिक चक्र बदलले
वसंत ऋतू हा रंगांचा ऋतू आहे. या ऋतूत सगळीकडे वेगवेगळे रंग पाहायला मिळतात. प्रत्येक झाडावर पक्षी येऊन बसतात. हे दृश्य पाहण्यासारखे असते. पण, आज जागतिक तापमानवाढीमुळे नैसर्गिक चक्र बदलले आहे.
फुलांचा तो रंग, स्थलांतरित पक्ष्यांचे भारतातील प्रवासाचे चक्र सर्व काही बदलत चालले असून, अवेळी येणारा पाऊस, पाण्याची कमतरता असे चित्र पाहायला मिळत आहे. आजच्या परिस्थितीत जागतिक तापमानवाढीमुळे जगभरात जंगल नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे जीव जात आहेत. हे चित्र भारतातही पाहायला मिळत आहे. या बदलांबाबत लोकांनी जागरुक झाले पाहिजे, असे डॉ. पांडे म्हणाले.