

आळेफाटा: जुन्नर तालुक्यातील बेल्हे आळकुटी रोडवरील रानमळा येथे अज्ञात चोरट्यांनी गुरूवारी मध्यरात्रीनंतर धुमाकूळ घातला. बेल्हे आळकुटी रोडवरील रानमाळा येथे चोरट्यांनी ८५ वर्षीय वृद्ध महिलेस मारहाण करत अंदाजे 5 हजार रुपये व एक तोळा सोन्याचे दागिने लुटून नेले. प्रतिकार करताना या महिला जखमी झाल्या आहेत. ही घटना गुरुवार (दि 16) पहाटे पूर्वी तीन वाजेच्या दरम्यान घडली.
जिजाबाई गबाजी गुंजाळ (वय 85) असे जखमी वृध्द महिलेचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की बेल्हे आळकुटी रोडवरील रानमळा येथे अज्ञात चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्रीनंतर ते गुरुवारी पहाटेपूर्वी धुमाकूळ घातला. त्यांचा तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाला. यानंतर ते घरात एकटाच राहत असलेल्या जिजाबाई गुंजाळ यांच्या घराकडे आले. त्यावेळेस त्या शौचालयात बाहेर गेल्या होत्या. चोरट्याने त्यांना लोखंडी गजाने त्यांच्या डोक्यावर हातावर मारहाण करत जखमी करून त्यांच्या गळ्यातून दागिने काढून घेतले.
घरात प्रवेश करत कपाट उचकटून त्यातील रोख रक्कम व चांदीचे दागिने लुटून नेले या घटनेनंतर तातडीने जिजाबाई गुंजाळ यांना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यांच्या डोक्याला तसेच हाताला जखमा झाल्या असून एकूण २० टाके पडले असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या गळ्यातील एक तोळे सोन्याचे दागिने कपाटातील पाच हजार रुपये व चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. घटनेची माहिती मिळताच आळेफाटा पोलीस निरीक्षक विश्वास जाधव घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू केला आहे. आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू आहे