

पुणे: येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील स्वच्छतेचे काम मी 2017 पासून करतो. गेल्या दोन वर्षांपासून माझी सुमारे 2 कोटींची बिले थकवली आहेत, ती बिले मागण्यासाठी मी गेलो असता, रुग्णालयाचे अधीक्षक श्रीनिवास कोलोड यांनी ‘आमचा प्रोटोकॉल करावा लागेल’ असे सांगत बिले काढण्यासाठी कमिशनची मागणी केली, असा आरोप रुग्णालयाचे स्वच्छता ठेकेदार आणि लोकराज्य स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेचे विजय कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केला.
पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत कांबळे बोलत होते. ते म्हणाले, मागील 20 महिन्यांपासून स्वच्छतेचे दर महिन्याचे बिल मी जमा करून देखील मला अधीक्षक कोलोड यांनी थकीत बिलाची रक्कम अदा केली नाही. फक्त 35 टक्केच बिल काढण्यात आले. मी कामगारांचा पगार, ईएसआय, पीएफ कर्ज काढून, घरातील सोने गहाण ठेवून केला आहे. बिले मागायला गेलो असता मला कमिशन द्या, अशी मागणी करत होते.
ते न दिल्यामुळे त्यांनी संस्थेचे पूर्ण बिल काढलेले नाही. त्यामुळे मी रीतसर वरिष्ठ कार्यालयाला एक महिने अगोदरच वरिष्ठ कार्यालयाला सुचित करून कायदेशीर नोटीस देऊन 1 एप्रिल 2026 पासून येथील काम पूर्णपणे बंद केले आहे. 31 मार्च 2026 नंतर रुग्णालयाच्या कामाशी माझा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, असे असताना रुग्णालय प्रशासन माझ्यावर कोणतेही आरोप करत आहे. मात्र, ही बिले मिळविण्यासाठी मी आरोग्यमंत्री यांची भेट घेणार आहे. याशिवाय न्यायालयात देखील जाणार आहे.
विजय कांबळे यांनी केलेले सर्व आरोप धादांत खोटे असून, निराधार आहेत. एवढे वर्ष त्यांनी न केलेल्या कामाचे देयक अदा करून घेऊन सध्या प्रत्यक्ष केलेल्या कामाचे दर्जानुसार 35 टक्के देयक अदा केल्यामुळे हे सर्व धादांत खोटे आरोप करत आहेत. मनोरुग्णांची गोपनीयता भंग केल्याने संबंधितावर मानसिक आरोग्य कायदे 2017 नुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे सदर विषयास विषयांतर करण्यासाठी माझ्यावर आणि रुग्णालय प्रशासनावर कांबळेंकडून धादांत खोटे आरोप केले जात आहेत.
डॉ. श्रीनिवास कोलोड, अधीक्षक, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय