पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सध्या 86 आरोग्यवर्धिनी केंद्रे आणि 3 आपला दवाखाना कार्यान्वित झाले आहेत. येथील वैद्यकीय अधिकारी या पदासाठी 22 जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी एमबीबीएसची पदवी पूर्ण झालेल्या 265 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांना केवळ 25 हजार रुपये वेतन मिळणार आहे. तरीही इतक्या उमेदवारांनी अर्ज केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Latest Pune News)
महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहरातील प्राथमिक आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यासाठी 125 आरोग्यवर्धिनी केंद्रे आणि 25 ‘आपला दवाखाना’ सुरू करण्याची योजना आखण्यात आली. सध्या 5 परिमंडळांमध्ये 86 केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. केंद्रांमध्ये योगा, व्यायाम प्रशिक्षणासह औषधोपचार केले जात आहेत. आरोग्यवर्धिनी केंद्रांसाठी मनुष्यबळ पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
आपला दवाखानासाठी 1 लाख रुपये भाडे देण्याचे राज्य शासनाकडून सांगण्यात आले. सुरुवातीला महापालिका आयुक्तांनी इतर जागा भाड्याने घेण्याऐवजी महापालिकेच्याच जागा वापरण्याचा फतवा काढला. मात्र, जागा उपलब्ध होत नसल्याने पुन्हा भाडेतत्वावर जागा घेण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांकडे 33 जागांवर आपला दवाखाना सुरू करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, ही जबाबदारी आता महापालिकेकडे सोपवण्यात आली आहे. त्यापैकी सध्या केवळ 3 आपला दवाखाना सुरू करण्यात आले आहेत.
या केंद्रांसाठी महानगरपालिकेकडून 22 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. यासाठी एकूण 265 एमबीबीएस उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. विशेष म्हणजे, या पदांसाठी केवळ 25 हजार रुपये मासिक मानधन निश्चित करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलेले उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण झाल्यास वेतनाशिवाय 15 हजार रुपये अतिरिक्त दिले जाणार आहेत. तज्ज्ञ व पात्र उमेदवारांना अशा अल्प वेतनावर नियुक्ती देण्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
परिमंडळ - आरोग्यवर्धिनी
1 - 23
2 - 9
3 - 26
4 - 23
5 - 5
वैैद्यकीय अधिकाऱ्यांच्या 22 जागांसाठी एमबीबीएस पूर्ण झालेल्या 265 उमेदवारांचे अर्ज आले आहेत. सध्या त्यांच्या मुलाखतींची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांच्या पदांसाठी दिलेल्या जाहिरातींमध्ये वेतनाचा स्पष्ट उल्लेख आहे.डॉ. निना बोराडे, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका