

पिंपरखेड : पिंपरखेड (ता. शिरूर) येथे बिबट्याच्या हल्ल्यात शिवन्या बोंबे या चिमुकलीचा मृत्यू झाल्यानंतर वन विभागाकडून घटनास्थळ परिसरात लावण्यात आलेल्या पिंजर्यात एका पाच वर्षांची बिबट मादी सोमवारी (दि. 13) पहाटे जेरबंद झाली.
नरभक्षक बिबट्या मोकाट असण्याची शक्यता लक्षात घेऊन बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून या परिसरात तब्बल 10 पिंजरे लावण्यात आले आहेत. पिंपरखेड येथे रविवारी (दि. 12) भरदिवसा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पिंपरखेड आणि परिसरातील ग्रामस्थांनी आक्रमक होत बेल्हे - जेजुरी राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करत वन विभागाच्या अधिकार्यांना धारेवर धरले.
वन विभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी घटनास्थळ परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी दहा पिंजरे लावण्यात आले होते. घटनास्थळाजवळच लावण्यात आलेल्या एका पिंजर्यात सोमवारी पहाटे बिबट्या कैद झाला. वन विभागाकडून पिंजर्यात कैद झालेल्या बिबट्याला माणिकडोह येथील बिबटनिवारण केंद्रात सोडण्यात आले.