

पुणे : महापालिकेच्या परवानगीशिवाय शहरातील विविध भागांमध्ये मनमानीपणे रस्तेखोदाई करणाऱ्या ‘सीसीटीव्ही’ केबल टाकण्याच्या पोलिसांच्या ठेकेदाराला पुणे महानगरपालिकेने कडक शब्दांत समजपत्र बजावले आहे. पुढील काळात परवानगीपेक्षा जादा क्षेत्रात रस्ते खोदताना आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे. तसेच, दिवाळीपर्यंत सुरू असलेली खोदाईची सर्व कामे थांबविण्याचे आदेशही महापालिकेने दिले असल्याची माहिती पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सोमवारी दिली.(Latest Pune News)
महापालिकेने ‘सीसीटीव्ही’ प्रकल्पासाठी फक्त पेठ परिसरातच रस्तेखोदाईची परवानगी पोलिस विभागाला दिली होती. मात्र, पोलिसांनी नेमलेल्या ठेकेदाराने संधी साधत शहरातील इतर भागांतही खोदाई सुरू केल्याचे समोर आले. तसेच, ही खोदाई करून चुकीच्या पद्धतीने खड्डे बुजवल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याबाबत नागरिकांनी महानगरपालिकेकडे तक्रारी केल्या. तसेच, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी देखील याबाबत थेट पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ठेकेदारांची तक्रार केली. त्यांना परवानगी नकाशा आणि प्रत्यक्षात झालेली खोदाई याचे पुरावे अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर आयुक्तांनी ठेकेदाराला सुनावत महापालिकेकडून पुन्हा तक्रार येऊ न देण्याच्या सूचना दिल्या.
महापालिकेने ठेकेदाराला पाठवलेल्या समजपत्रात नमूद केले आहे की, पुढील काळात नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई होईल. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पेठांमध्ये नागरिकांची गर्दी वाढत असते. अशावेळी सुरू असलेल्या खोदाईमुळे वाहतूक कोंडी व नागरिकांना त्रास होत असल्याने सणानिमित्त सर्व खोदाई तत्काळ थांबवावी, असे आदेश दिले आहेत.
महापालिकेने रस्ते खोदाई केवळ पेठांच्या परिसरापुरती मर्यादित ठेवली होती. मात्र, ठेकेदाराने इतर भागातही खोदाई केली. दररोज ठराविक मीटर खोदाई अपेक्षित असताना किलोमीटरच्या अंतरावर काम करण्यात आले. त्यामुळे कडक शब्दात समजपत्र देण्यात आले असून ही बाब पोलिस आयुक्तांच्या निदर्शनास आणली आहे.
अनिरुद्ध पावसकर, पथ विभाग प्रमुख, पुणे महापालिका