Development Work Pudhari
पुणे

Pune Grand Tour Road Work: पुणे ग्रँड टूरसाठी ४१८ किमी रस्त्यांची कामे; ५५ टक्के काम पूर्ण

सहा टप्प्यांपैकी पाच टप्प्यांतील रुंदीकरण, दुरुस्ती व मजबुतीकरण सुरू; बारामती-सासवड मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे ग्रँड टूरच्या दुसर्‍या पर्वासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सहा टप्प्यांपैकी पाच टप्प्यांतील रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत. या कामांमध्ये रुंदीकरण, दुरुस्ती आणि मजबुतीकरणाचा समावेश असून, आतापर्यंत एकूण कामापैकी सुमारे ५५ टक्के काम पूर्ण झाली आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर यांनी दिली. चालू कामांच्या आराखड्यात सुमारे ४१८ किलोमीटरच्या रस्त्यांचा समावेश आहे.

बाविस्कर म्हणाले,“ गेल्या वर्षी सुमारे २४५ किलोमीटर रस्त्यांची कामे झाली. यंदा सुमारे ४१८ किलोमीटरच्या कामांपैकी २७६ किलोमीटर रस्त्यांचे रुंदीकरण, तर १४२ किलोमीटर रस्त्यांची दुरुस्ती व मजबुतीकरण केले जात आहे. ही कामे विविध टप्प्यांमध्ये सुरू असून, प्रत्येक मार्गावरील प्रगती वेगवेगळी आहे.

लेडीज क्लब ते नांदेड सिटी या पहिल्या टप्प्यातील मार्गाची लांबी १७५.५० किलोमीटर आहे. त्यापैकी विभागाच्या कामाची लांबी ८२.५० किलोमीटर असून, या टप्प्यात सुमारे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. बारामती ते सासवड या दुसर्‍या टप्प्यात १६९ किलोमीटरचा मार्ग असून, त्यामध्ये १७ किलोमीटरचे नवीन काम आहे. या टप्प्यातील काम सुमारे ८० टक्के पूर्ण झाले आहे.

जुन्नर ते राजगुरुनगर ६० टक्के काम पूर्ण

जुन्नर ते राजगुरुनगर या तिसर्‍या टप्प्यात रुंदीकरणासह नवीन कामांचा समावेश असून, मार्गाची लांबी १३१.५० किलोमीटर आहे. येथे सुमारे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. आळंदी ते लोणावळा या चौथ्या टप्प्यातील १७५ किलोमीटरच्या मार्गावर सुमारे ३५ टक्के काम झाले आहे. या मार्गातील काही भाग नगरपालिका, एमआयडीसी आणि अन्य स्थानिक यंत्रणांच्या क्षेत्रात येतो. लोणावळा ते हिंजवडीतील टीसीएस सर्कल या पाचव्या टप्प्यातील मार्गाची लांबी १४२ किलोमीटर आहे. घाटमार्गाचा समावेश असल्याने हा टप्पा महत्त्वाचा मानला जात आहे. या मार्गावर सुमारे ४० टक्के काम पूर्ण झाल्याचे बाविस्कर यांनी सांगितले.

सहा टप्प्यांपैकी पाच टप्प्यांतील रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहेत. टप्पानिहाय आढावा घेतला असता एकूण काम सुमारे ५५ टक्के पूर्ण झाले आहे.
भरतकुमार बाविस्कर, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT