Election Voting Pudhari
पुणे

Pune Graduate Teacher Constituency Election: पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबरला मतदान; साडेचार लाख मतदार बजावणार हक्क

पाच जिल्ह्यांत १,०५१ मतदान केंद्रे सज्ज; ७७ उमेदवार रिंगणात, २७ ऑक्टोबरला मतमोजणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: विधानपरिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. पुण्यासह पाच जिल्ह्यांत १,०५१ मतदान केंद्रांवर शुक्रवारी (दि. २३ ऑक्टोबर) सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. या निवडणुकीत पदवीधर मतदारसंघात ४७, तर शिक्षक मतदारसंघात ३० उमेदवार नशीब आजमावत आहेत.

निवडणुकीसाठी सुमारे ६,९०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी शुक्रवारी निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांत मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

२४ तास नियंत्रण कक्ष

मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, वीज, रॅम्प, स्वच्छतागृहे, प्रथमोपचार आणि मतदार मदत केंद्रांसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी भरारी पथके तैनात असून, राजकीय जाहिरातींचे पूर्वप्रमाणीकरण आणि पेडन्यूजवर लक्ष ठेवले जात आहे. तक्रारींसाठी विभागीय आयुक्त कार्यालयात २४ तास नियंत्रण कक्ष सुरू केला असून, नागरिकांनी ०२०-२६३४०५३४ या क्रमांकावर संपर्क साधावा. २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. मतदारांनी वैध पसंतीक्रम नोंदवून मतदान करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

साडेचार लाख मतदार बजावणार हक्क

पदवीधर मतदारसंघात ३ लाख ८८ हजार १९, तर शिक्षक मतदारसंघात ६२ हजार मतदार आहेत. दोन्ही मतदारसंघांत मिळून ४ लाख ५० हजार १९ मतदार मतदान करणार आहेत. पदवीधर मतदारसंघासाठी ७४१, तर शिक्षक मतदारसंघासाठी ३१० मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. पदवीधर मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख १४ हजार ५६२ मतदार, तर शिक्षक मतदारसंघात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १६ हजार ८८२ मतदार आहेत.

७ हजार कर्मचाऱ्यांवर जबाबदारी

प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी आणि एक शिपाई असे पथक तैनात असेल. राखीव कर्मचाऱ्यांसह पदवीधर मतदार संघासाठी ४ हजार ७१५, तर शिक्षक मतदार संघासाठी २ हजार २२७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानासाठी जम्बो मतपेट्यांची व्यवस्था केली असून, मतदानानंतर मतपेट्या पोलिस बंदोबस्तात बालेवाडी येथील स्वीकृती केंद्रात ठेवण्यात येणार आहेत. यासाठी ७५० वाहनांचे नियोजन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT