डॉ. सतीश देसाई
हे शहराच्या राजकारण, समाजकारणातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व. विद्यार्थिदशेत त्यांनी खेळातही उत्कृष्ट कामगिरी केली. सामाजिक कार्यामुळे ते राजकारणाकडे वळले. महापालिकेच्या आपल्या पहिल्याच निवडणुकीत त्यांनी तत्कालीन दिग्गज राजकारणी अण्णा जोशी यांना पराभवाचा धक्का दिला. ही निवडणूक ते कशी जिंकले, याच्या रंजक आठवणी त्यांच्याच शब्दांत...
महापालिकेच्या निवडणुका 1979 ला जाहीर झाल्या. मंडईतील महात्मा फुले मार्केट वॉर्डावर (क्र. 28) जनसंघाचा पगडा होता. जनसंघाचे अण्णा जोशी हे तेथून सलग दोनवेळा निवडून आलेले नगरसेवक होते. अशा परिस्थितीत या वॉर्डातून कोण लढणार? हा प्रश्न विरोधकांना पडला होता.
दोन-अडीच वर्षांपूर्वी मी याच परिसरात छोटासा दवाखाना सुरू केला होता. वडिलांचे किराणा मालाचे दुकानही येथेच होते. त्यामुळे या परिसरातील प्रत्येक घर आमच्या संपर्कात होते. अखिल मंडई मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात मी एक कार्यकर्ता म्हणून कार्यरत होतो. युथ काँग्रेसमध्येही सक्रिय असल्याने मंडईतील खन्ना कट्ट्यावरची ऊठबसही वाढली होती. रात्रीच्या वेळी शहरातील अनेक मान्यवर येथे हजेरी लावत असत. वसंतराव थोरातांनी येथेच मला हेरले असावे. मला आठवतेय की, एक दिवस केव्हातरी वसंतराव थोरात माझ्या दवाखान्यात आले अन् म्हणाले, ‘डॉक्टर महापालिकेची निवडणूक लढवणार का?’ त्यावर मी म्हणालो, ‘तात्या, आपले ते काम नाही अन् मला ते झेपणारही नाही.’ त्यावर माझे काहीही न ऐकता, ‘अण्णा जोशींविरोधात आपल्याला एक चांगला उमेदवार मिळाला आहे’, असे त्यांनी थेट आदरणीय निळूभाऊ लिमयेंना कळवून टाकले. त्यानंतर खुद्द निळूभाऊंनीच मला सांगितले की, तुम्हाला ही निवडणूक लढवायची आहे. खुद्द त्यांच्याकडूनच हा आदेश आल्याने निवडणूक लढविण्याखेरीज अन्य कसलाही पर्याय माझ्यापुढे शिल्लक नव्हता.
निळूभाऊंच्या या आदेशानंतर मी हा वॉर्ड फिरून पाहिला. त्या वेळी जाणवले की, हा सारा जनसंघाचा पगडा असलेला भाग आहे. शेवडे बोळ, भाऊ महाराज बोळ, जोगेश्वरीचा बोळ, तुळशीबाग हा सगळा परिसर हार्डकोअर जनसंघाचा म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे अशा मतदारसंघातून आपण कसे काय निवडून येऊ शकू? असा प्रश्न मला पडला होता. पण, सुदैवाने या परिसरात माझा मित्रपरिवार खूप मोठा होता. माझे मामा प्रसिद्ध डॉ. मनोहर शेठ यांचे तुळशीबागेत मोठे हॉस्पिटल होते. माझ्या अनेक नातेवाइकांची घरेही या परिसरात होती. पूना गेस्ट हाऊसच्या मागेच माझा मित्र प्रल्हाद सावंत राहत होता. त्यामुळे या वॉर्डातील प्रत्येक भागात कोणी ना कोणी विविध कारणांनी माझ्या संपर्कातले होते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जाणे सोपे झाले आणि माझे मामा डॉ. शेठ यांच्यासह या मंडळींनीही प्रत्येक घराघरात जाऊन मनापासून माझा प्रचारही केला.
शिवाजी रस्त्यावरील ग्लोब टॉकीजचा (नंतरचे श्रीनाथ थिएटर) परिसरही याच वॉर्डात होता. ग्लोब टॉकीजजवळ मोठ्या संख्येने देवदासी राहत होत्या. त्यांचा पाठिंबा कसा मिळवायचा, हे समजत नव्हते. त्या वेळी आप्पा थोरातांनी पुढाकार घेतला. मला आठवतेय की, आप्पांनी कुसाळकर शेठना मंडईत बोलावून घेतले. मंडईतील झुणका-भाकर केंद्रासमोरील गल्लीत एका छोट्याशा मंदिरात रात्री बाराच्या सुमारास आप्पा मला घेऊन गेले. त्या वेळी मंदिरात कुसाळकर शेठही होते. काही देवदासी होत्या आणि त्यांची मालकीण तुळसाअक्काही होत्या. कुसाळकर शेठनी तुळसाअक्कांना बेल-भंडारा उचलायला सांगून या मुलाच्या पाठीशी उभे राहायचे, अशी शपथ घ्यायला सांगितली. अक्कांनी शपथ घेतली अन् सर्व देवदासी भगिनी माझ्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या.
निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर केव्हातरी निळूभाऊ लिमये हे त्यांच्या छोट्याशा गाडीतून मंडईतील बुरुड आळीत आले. गाडीतून उतरताच ते बुरुडांचे नेते हरीभाऊ यांच्याकडे गेले. त्यांनी विचारले, ‘हरीभाऊ कोणाचे काम करताय !’ हरीभाऊ घाबरले अन् म्हणाले, ‘साहेब यंदा डॉक्टरांचे काम करतोय.’ त्यावर खूष होऊन निळूभाऊ म्हणाले, ‘हा मग ठीक आहे, तोच आपला उमेदवार आहे.’ जेथे माझा छोटासा दवाखाना होता, त्या भागातील लोक तर माझ्या मागे उभे राहिलेच; पण मंडई परिसरातील सगळे व्यापारी, नातेवाईक, मित्र, खेळाडू असे सगळेच माझ्यासाठी फिरू लागले. नागरी संघटनेकडून मी अण्णा जोशींविरुद्ध तर शेजारच्या वॉर्डातून माझा मित्र अरुण वाकणकर हा दत्तोपंत मेहेंदळे यांच्याविरुद्ध उभा होता. त्यामुळे दोन दिग्गजांविरुद्ध दोन नवखे तरुण, अशी शहरभर चर्चा सुरू झाली अन् पाहता पाहता या वॉर्डाच्या निवडणुकीची चर्चा शहरभर रंगू लागली.
आमच्या प्रचारासाठी शहरातील छत्रपती ॲवॉर्डविजेत्या खेळाडूंनी मशाल मोर्चा काढला. प्रल्हाद सावंत हा या मोर्चाचा कर्ता करविता होता. त्यामुळे वॉर्डात चांगलीच वातावरणनिर्मिती झाली. या मोर्चाच्या दुसऱ्याच दिवशी काका वडके यांची तोफ धडाडली. ते म्हणाले, ‘महापालिकेत छत्रपती पुरस्कारविजेत्यांचे काय काम?’ त्याला प्रत्युत्तर म्हणून बाबा आढावांनी जागोजागी बैठका घेतल्या. त्यामुळे जिलब्या मारुती चौकातील प्रत्येक कार्यकर्ता जिवाच्या आकांताने माझ्यासाठी झटू लागला. ज्या शर्मा वाड्यात मी राहत होतो, त्या ठिकाणी मोठी चाळ होती. तेथे शंभर एक बिऱ्हाडे होती आणि 300 ते 400 मते होती. त्या घरातील प्रत्येक व्यक्ती जणू आपल्याच घरातले कार्य आहे, असे समजून कामाला लागले. खरेतर या निवडणुकीत मी विजयी होण्याची सुतराम शक्यता नव्हती. परंतु, तापलेल्या वातावरणामुळे सर्वसामान्य मतदारही या निवडणुकीत मोठ्या उत्साहाने सहभागी होत होता.
काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात माजी नगरसेवक व भाजप नेते उज्ज्वल केसकर यांची भेट झाली. गप्पांच्या ओघात माझ्या या जाएंट किलर ठरलेल्या पहिल्या निवडणुकीचा विषय निघाला तेव्हा त्या वेळची आठवण सांगताना केसकर म्हणाले की, तुमची विजयी मिरवणूक निघाली तेव्हा खास तुम्हाला पाहण्यासाठी मी रस्त्याकडेला उभा होतो. अण्णा जोशींना पाडणारा मुलगा कोण? हे पाहण्याची आम्हाला उत्सुकता होती.
पूना गेस्ट हाऊसचे चारूकाका सरपोतदार हे हार्डकोअर संघाचे. पण, माझ्या प्रचाराचा नारळ त्यांनीच फोडला. ताई आगाशे याही संघाचे काम करायच्या; मात्र त्यांनीही मला मनापासून पाठिंबा दिला. देसाई आंबेवाले यांच्या शेजारील मोठ्या वाड्यात राहणारा मित्र प्रशांत जोशी, त्याची आई व सारे कुटुंबीय खरेतर संघाचे; पण तेही माझ्यासाठी घराबाहेर पडले. आयुष्यभर संघाचे काम करणारी ही मंडळी अण्णा जोशी यांच्याविरुद्ध माझा प्रचार कसा करीत होते, याचे कारण मला अजूनही उलगडलेले नाही. कदाचित, माझ्यावरील प्रेम आणि विश्वास, यामुळेच ते माझ्या पाठीमागे उभे राहिले असावेत. निकालानंतर तर अत्यानंदाने ताईंनी मला मिठीच मारली. त्या वेळी डॉ. शैलेश गुजर हा मित्रही शेजारी होता. नेमका हा क्षण एका फोटोग््रााफरने टिपला व दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात हा फोटो ठळकपणे प्रसिद्ध झाला. त्यामुळे पुढे काही दिवस आगाशेंच्या घरात ‘भारत-पाकिस्तान’ असे वातावरण निर्माण झाले होते. आगाशे यांचे घर म्हणजे कट्टर जनसंघाचे आणि अशा घरातील ताई माझे जाहीरपणे कौतुक करताहेत, हे सत्य पचविणे त्यांच्या कुटुंबीयांना खूपच जड गेले. पुढे मीच त्यांच्याकडे जाऊन दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे वातावरणातील कटुता काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली.