

पुणे : शहराचा पारा शुक्रवारी १२.७ अंशावर खाली आला. त्यामुळे यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत शहरात यंदा १५ दिवस उशीरा थंडीचे आगमन झाले आहे.
दरवर्षी ऑक्टोबर मध्ये शहरात थंडीचा शिरकाव होतो. दिवाळीच्या सुमारास शहरात थंडी जाणवू लागते. मात्र यंदा तसे झाले नाही. दिवाळीपर्यंत पाऊस सुरु असल्यामुळे बाष्पयुक्त वाऱ्यांचा मुक्काम वाढला त्यामुळे शहरात थंडी जाणवली नाही. मात्र नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात तापमान अचानक कमी होत जावून शुक्रवारी १४ नोव्हेंबर रोजी शहराचा पारा १३.८ अंशावरुन १२.७ अंशावर खाली आला.
शहरात सायंकाळी बोचरे वारे वाहत असल्यामुळे गत पाच दिवस थंडीचा कडाका जास्त जाणवत होता. मात्र शुक्रवार पासून वाऱ्यांचा वेग मंद झाला त्यामुळे तापमानात घट होवून देखील सायंकाळी तापमान १२.८ अंशावर आल्याचे जाणवत नव्हते.
शहरात हिवाळ्यात खडकवासला भागातील एनडीए परसिराचे किमान तापमान सर्वात कमी असते मात्र थंडी सुटल्यापासून हे तापमान निरंक येत आहे. या बद्दल हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, येथील स्वयंचलीत तापमान केंद्रात तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे येथील तापमान काही दिवसांपासून नोंदले जात नाही. लवकरच ते दुरुस्त होईल.
शिवाजीनगर १२.७
पाषाण १२.३
लोहगाव १६.५
चिंचवड १६.५
लवळे १७.७
कोरेगावापार्क १६.७