

शिरूर मतदारसंघातील वाघोली आणि वडगाव शेरी मतदारसंघातील खराडी अशा प्रत्येक समसमान भागांचा समावेश असलेल्या खराडी-वाघोली या प्रभाग क्र. 4 मध्ये इच्छुक उमेदवारांपेक्षा शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर कटके आणि वडगाव शेरीचे बापूसाहेब पठारे यांचीच प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. या प्रभागात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप, अशी तिरंगी लढत रंगणार असल्याचे स्पष्ट आहे.
महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीतील खराडी-चंदननगर या प्रभागात आता नव्याने समाविष्ट झालेल्या वाघोली गाव जोडले गेले आहे, तर चंदननगर वगळले आहे. गत पालिका निवडणुकीत भाजपची लाट असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वच्या सर्व चार जागा जिंकल्या होत्या. या भागांवर आमदार पठारे यांनी प्रत्येक निवडणुकीत वर्चस्व कायम ठेवले आहे. आता आमदार पठारे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आमदार आहेत.
मात्र, त्यांचा मुलगा सुरेंद्र पठारे यांच्या कुटुंबातील इच्छुक सदस्य भाजपात प्रवेश करण्याची चर्चा आहे. त्यांच्या पक्षप्रवेशावरच येथील राजकीय गणिते ठरणार आहेत. या प्रभागात एक जागा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी (एसी) आरक्षित होणार असल्याचे स्पष्ट आहे. या प्रभागात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. एकीकडे खराडीसारखा आयटी पार्क असलेला विकसित भाग, तर दुसरीकडे विकासापासून दूर असलेला वाघोली परिसर, असे या प्रभागाचे चित्र आहे. खराडी-चंदननगर परिसरातील रहिवाशांना मूलभूत सुविधा मिळत असल्या, तरी वाघोलीकरांना या सुविधा देताना लोकप्रतिनिधींसह प्रशासनाची दमछाक होणार आहे.
भाजपकडून संदीप सातव, सचिन सातपुते, स्वप्निल चव्हाण, ज्योती जावळकर, अरविंद गोरे, शैलजित बनसोडे, ॲड. सचिन पठारे, सोनिया पठारे, अनिल नवले, पूजा पठारे आदी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून माजी नगरसेवक महेंद्र पठारे, भैयासाहेब जाधव, संतोष भरणे, ऐश्वर्या पठारे, शिवदास उबाळे, वसुंधरा उबाळे, महादेव पठारे, पप्पू गरुड, शीतल गरुड, नाना आबनावे, सदाशिव गायकवाड, प्रकाश जमधडे आदी इच्छुक आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून समीर भाडळे, रामकृष्ण सातव, बाळा पऱ्हाड, तेजश्री पऱ्हाड, दर्शना स्वप्निल पठारे, रेणुका सोमनाथ पठारे, वैभव पंचमुख, मालती गोगावले, प्रभा करपे, शांताराम कटके आदींची नावे चर्चेत आहेत. माजी पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे, सतीश ढोले हेदेखील इच्छुक आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून सारिका पवार, ॲड. गणेश म्हस्के, विक्रम वाघमारे हे इच्छुक आहेत. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमधून निवडणूक लढविण्यासाठी फारसे कोणी इच्छुक नसल्याने तिकीट न मिळालेल्या इतर पक्षांतील आयात उमेदवारांना या पक्षांकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दोन्ही आमदारांची प्रतिष्ठा पणाला
या प्रभागात वडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे आणि हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. मात्र, केवळ तांत्रिकदृष्ट्या पठारे हे शरदचंद्र पवार पक्षात राहणार की ते आपली ताकद पुतण्या आणि भाच्याच्या मागे लावणार, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.
‘तुतारी’ कडील उमेदवार ‘कमळा’कडे..?
या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडील (तुतारी) इच्छुक उमेदवार भाजपकडून (कमळ) लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. आमदारपुत्र सुरेंद्र पठारे यांच्यासोबत माजी नगरसेवकांचा प्रवेश होऊ शकतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कोण लढणार, याची जोरदार चर्चा सध्या नागरिकांत सुरू आहे.