Ganeshotsav Moving Tableaux Pudhari
पुणे

Pune Ganeshotsav Moving Tableaux: गणेशोत्सवातील हलते देखावे बदलले; बिबट्या-मानव संघर्षापासून मोबाइलच्या दुष्परिणामांपर्यंत सामाजिक विषयांचा जागर

पौराणिक-ऐतिहासिक कथानकांसोबत महिला सुरक्षितता, प्लास्टिक, ध्वनिप्रदूषण अन् शहरातील बदलत्या वास्तवावर भाष्य; कलाकारांची लगबग अंतिम टप्प्यात

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गणेशोत्सवातील हलते देखावे आता फक्त पौराणिक आणि ऐतिहासिक कथानकांवर आधारित राहिलेले नाहीत. तर त्यातून बदलत्या काळातील सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकत समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच आता सामाजिक विषयांवरील देखाव्यांना यंदा मंडळांकडून सर्वाधिक प्रतिसाद आहे.

पौराणिक आणि ऐतिहासिक कथानकांसोबतच बिबट्या-मानव संघर्ष, मोबाइलचे दुष्परिणाम, प्लास्टिकचा वाढता वापर, ध्वनिप्रदूषण, महिला सुरक्षितता, शहरातील बदलती परिस्थिती, यांसारखे ज्वलंत सामाजिक विषय हलत्या देखाव्यांमधून मांडले जाणार आहेत. त्यामुळे यंदा गणेशोत्सवामध्ये सामाजिक भान जागविणारे देखावेही पाहायला मिळणार आहेत.

गेल्या काही वर्षांत सजीव अर्थात जिवंत देखाव्यांकडे मंडळांचा कल वाढला असला, तरी हलत्या देखाव्यांची मागणी आजही कायम आहे. यंदा हलत्या देखाव्यांच्या विषयांमध्ये वैविध्य दिसून येत आहे. सामाजिक विषयांवरील देखाव्यांना मंडळांकडून मागणी असून, त्यामुळे बाप्पाच्या दर्शनासोबतच सामाजिक वास्तवाचे भान देणारे देखावेही श्रीगणेश भक्तांना पाहायला मिळणार आहेत. हलते देखावे तयार करणार्‍या कलाकारांनी मंडळांच्या संकल्पनेनुसार सेट तयार केले असून, गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरल्याने काम अंतिम टप्प्यात आले आहे.

सामाजिक विषयांसोबतच पौराणिक आणि ऐतिहासिक देखाव्यांनाही यंदा मागणी आहे. होलिका दहनापासून ते स्वर्ग - नरकपर्यंत अशा विविध विषयांवर पौराणिक देखावे साकारण्यात आले आहेत. तर प्रभू श्री राम यांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित ते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारे देखावेही तयार करण्यात आले आहेत. 'ऑपरेशन सिंदूर'पासून 'राजकारणावर बोलू काही...' पर्यंत अशा विविध विषयांवरील हलते देखाव्यांनाही मागणी आहे.

विषयाला अनुसरुन पुतळ्यांची वेशभूषा

एका हलत्या देखाव्याच्या सेटमध्ये विषयानुसार साधारण चार ते दहा फायबरच्या पुतळ्यांचा समावेश असतो. विषयाला अनुसरून पुतळ्यांची वेशभूषा आणि आभूषणे तयार केली जातात. पुतळ्यांना हालचाल करण्यासाठी विशेष यंत्रणा बसविली जाते. साधारण २० ते ६० हजार रुपयांपर्यंत देखाव्याचे भाडे असते. तयार केलेला सेट मंडळाकडे दिल्यानंतर त्याची मांडणी मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT