

पुणे: गणेशोत्सवाचा उत्साह आणि जल्लोष कायम राहावा; मात्र, त्यासाठी कर्णकर्कश डीजे, डॉल्बी आणि तीव्र ध्वनियंत्रणेची गरज नाही. पारंपरिक वाद्यांमुळे संस्कृती जपली जाते, कलाकारांना व्यासपीठ मिळते आणि तरुणांमध्ये संघभावना निर्माण होते. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाची योग्य काळजी घेऊन पारंपरिक वाद्यांची परंपरा पुढे नेली पाहिजे. तसेच, नागरिकांच्या आरोग्याला त्रासदायक ठरणाऱ्या तीव्र ध्वनिवर्धक व ध्वनिक्षेपक यंत्रणांवर कठोर नियंत्रण हवे. अशी रोखठोक मते दै. 'पुढारी'च्या वृत्तावर पुणेकरांनी नोंदविली.
गणेशोत्सव हा आनंद आणि भक्तीचा उत्सव आहे; मात्र, कर्णकर्कश आवाजामुळे तो नागरिकांच्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरू नये. उत्सवाचा आनंद घेताना आरोग्याची किंमत मोजावी लागू नये. त्यामुळे ध्वनिमर्यादेचे काटेकोर पालन करून डीजेच्या अतिरेकाला आळा घालणे आवश्यक आहे. पारंपरिक वाद्यांचाही वापर योग्य मर्यादेत व्हावा.
डॉ. अमेय वीर, राजस सोसायटी, कात्रज.
ध्वनिप्रदूषण रोखणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी कायदे अस्तित्वात असले, तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. डीजेच्या कर्णकर्कश आवाजाचा विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे डीजेऐवजी महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलांना प्राधान्य दिले पाहिजे.
ॲड. प्रकाश चव्हाण, धायरी
पारंपरिक वाद्यांवर काही प्रमाणात निर्बंध असणे आवश्यक आहे; मात्र त्यावर संपूर्ण बंदी घालणे योग्य ठरणार नाही. वाद्यांच्या तालमींसाठी विविध स्तरांतील नागरिक एक-दोन महिने सातत्याने एकत्र येतात. त्यातून संघटनात्मक काम, सामाजिक संवाद आणि एकोपा वाढतो. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाची योग्य काळजी घेत पारंपरिक वाद्यांची परंपरा सुरू ठेवण्यास हरकत नाही. मात्र, हे सामाजिक कारण लाऊड स्पीकरला लागू होत नाही. त्यामुळे तीव्र ध्वनिवर्धक आणि ध्वनिक्षेपक यंत्रणांवर नियंत्रण आवश्यक आहे.
अंकुर जोशी, पुणे.
पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. मात्र, गणेशोत्सवातील डीजे-डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज, अश्लील गाणी आणि हिडीस नृत्यामुळे उत्सवाचे धार्मिक व सामाजिक महत्त्व कमी होत आहे. मोठ्या आवाजाचा ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
गजानन केंगार, मांजरी बुद्रुक
डीजे व ध्वनिक्षेपकांच्या आवाजाची पातळी कमी करण्यासाठी पोलिस संबंधित मंडळांना सूचना देतात. मात्र, काही ठिकाणी पोलिसांशी अरेरावी केली जाते किंवा त्यांच्यावर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न होतो. कायदा सर्वांसाठी समान असताना पोलिसांच्या कारवाईत असा हस्तक्षेप होणे योग्य नाही. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांना सहकार्य केले पाहिजे. उत्सवाबरोबर शिस्त, परंपरेबरोबर कायद्याचा सन्मानही आवश्यक आहे.
ॲड. राकेश सोनार, सहकारनगर
सिंहगड रस्त्यावरील दत्तवाडी येथील ग्रामदैवत म्हसोबा मंदिराच्या उत्सवात पूर्वी मोठमोठ्या डीजे-साऊंडच्या भिंती उभारल्या जात होत्या. आता त्या पूर्णपणे बंद झाल्या आहेत. तरीही उत्सव पूर्वीच्याच उत्साहात आणि परंपरेने साजरा होतो. त्याच्या धार्मिक महत्त्वाला कोणतीही बाधा आलेली नाही.
दीपक वाघमारे, दांडेकर पूल, आंबील ओढा
गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र, उत्सव साजरा करताना इतर नागरिकांच्या शांततेचा आणि आरोग्याचाही विचार झाला पाहिजे. डीजे व ध्वनिक्षेपकांचा वापर करताना निर्धारित ध्वनीमर्यादा आणि वेळेचे काटेकोर पालन आवश्यक आहे. ध्वनिप्रदूषणाबाबतचे नियम केवळ गणेशोत्सवापुरते मर्यादित न राहता सर्व धर्मीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांना समानपणे लागू झाले पाहिजेत
ॲड. विजय बोरसे पाटील, जुनी सांगवी.
गणेश मंडळांना मोठमोठ्या डीजे आणि ध्वनिक्षेपकांची नेमकी गरज काय, हा प्रश्न आहे. काही मंडळांची चढाओढ आणि प्रतिष्ठेसाठी संपूर्ण समाजाला कर्णकर्कश आवाजाचा त्रास सहन करावा लागतो. त्याचा लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम होतो.
डॉ. हेमंत माळी, धायरी