

पुणे: सार्वजनिक गणेशोत्सवाला शेकडो वर्षांची सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात लोकांनी एकत्र यावे, त्यांच्यात जनजागृती व्हावी आणि स्वातंत्र्याच्या लढ्याला बळ मिळावे, या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सवाने महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, आज उत्सवाच्या नावाखाली डीजे, लेझर, प्लाझ्मा आणि कर्णकर्कश ध्वनियंत्रणेचा अतिरेक होत असेल, तर तो थांबला पाहिजे. उत्सवाचे पावित्र्य आणि नागरिकांचे आरोग्य यांना सर्वाधिक प्राधान्य दिले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी मांडली.
गणेशोत्सवासाठी डीजेची आवश्यकता नाही. डीजे, मिक्सर ग्रीड, प्लाझ्मा आणि लेझरसारखी साधने अलीकडच्या काळात उत्सवात आली आहेत. मात्र, त्याआधीही शेकडो वर्षे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा होत होता. गेल्या पाच ते दहा वर्षांत डीजेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे उत्सवातील मूळ सामाजिक आणि सांस्कृतिक भावनेपेक्षा आवाजाची स्पर्धा निर्माण होणे योग्य नाही. कार्यकर्त्यांनीही 'आम्हाला वाटते तसेच झाले पाहिजे', अशी भूमिका घेऊ नये.
उत्सव साजरा करताना संयम बाळगणे आवश्यक आहे. मंडळांच्या कार्यकर्त्यांपेक्षा शहरातील नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याचा विचार प्रथम झाला पाहिजे. डीजेच्या प्रचंड आवाजामुळे एखाद्याच्या श्रवणक्षमतेचे नुकसान झाले किंवा कोणी बहिरे झाले, तर त्याची भरपाई कोण देणार? लेझरमुळे एखाद्याच्या डोळ्यांना इजा झाली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल जगताप यांनी उपस्थित केला. पारंपरिक वाद्यांचा वापर जरूर व्हावा. ढोल-ताशा आणि इतर पारंपरिक वाद्ये गणेशोत्सवाच्या संस्कृतीचा भाग आहेत.
मात्र, त्यांचाही अतिरेक होऊ नये. कोणतेही वाद्य किंवा ध्वनियंत्रणा नागरिकांसाठी त्रासदायक ठरणार नाही, याची काळजी मंडळांनी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजकीय नेत्यांनीही कार्यकर्त्यांच्या चुकीच्या आग्रहाला पाठबळ न देता योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. उत्सवाचे पावित्र्य, नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक हित यांचा विचार करून भूमिका घेतली पाहिजे. पैसा आणि राजकीय पाठबळामुळे काही मंडळांमध्ये वाढत असलेली अरेरावी थांबणेही आवश्यक असल्याचे जगताप यांनी नमूद केले.
डीजेवरचा खर्च गरजूंसाठी करा
गणेशोत्सवातील आर्थिक ताकद ही डीजे आणि ध्वनियंत्रणेच्या स्पर्धेत दाखविण्याऐवजी समाजाच्या उपयोगासाठी आली पाहिजे. डीजे, प्लाझ्मा, लेझर आणि मोठ्या ध्वनियंत्रणेसाठी होणारा खर्च समाजप्रबोधन आणि पर्यावरण जनजागृतीसाठी करता येईल. गरजू कुटुंबांना मदत, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, तसेच समाजातील दुर्बल घटकांसाठी विविध उपक्रम राबविता येतील. गणेशोत्सवाची मूळ संकल्पनाच समाजाला एकत्र आणण्याची आहे. त्यामुळे मंडळांनी दिखाऊ खर्चापेक्षा सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांना प्राधान्य दिले पाहिजे.