Pune Police Pudhari
पुणे

Pune Ganesh Visarjan Crowd Management: पुणे गणेश विसर्जन मिरवणुकीत गर्दीचे सुरक्षित व्यवस्थापन महत्त्वाचे; पोलिस आयुक्त

अलका चौकातून गर्दीतून ३४ रुग्णवाहिका मार्गस्थ; ध्वनिमर्यादा उल्लंघनप्रकरणी २१ गुन्हे दाखल

पुढारी वृत्तसेवा

पुणे: विसर्जन मिरवणूक किती तास चालली, त्यापेक्षा गर्दीचे नियोजन हा आमच्यासाठी महत्त्वाचा विषय होता. मेट्रोमुळे प्रवासीसंख्या वाढली. त्याचबरोबर मंडळे देखील वाढली आहेत. त्यामुळे मिरवणुकीला वेळ लागणारच आहे. हे सर्व नजरेसमोर ठेवून आम्ही आमची भूमिका ठेवली होती. उत्सव कालावधीत नागरिकांची गैरसोय होऊ न देता उत्सव सुरक्षितपणे पार पडला, हे महत्त्वाचे आहे. मिरवणुकीदरम्यान गर्दीचे नियोजन, महिला सुरक्षा, वाहतूक व्यवस्थापन आणि तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर करण्यात आला. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शनिवारी दिली. विसर्जन मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर ते बोलत होते. या वेळी त्यांनी आपल्या पोलिस दलासह महापालिका प्रशासन, गणेश मंडळे, कार्यकर्ते आणि पुणेकरांनी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.

गर्दीच्या परिस्थितीत एकट्या अलका चौकातून तब्बल ३४ रुग्णवाहिका गर्दीतून मार्गस्थ करण्यात आल्याचे अमितेशकुमार यांनी सांगितले. मिरवणुकीचा कालावधी कमी करण्यासाठी यापूर्वी अनेक प्रयोग करण्यात आले आहेत. मात्र, गर्दीच्या परिस्थितीत एखादे गणेश मंडळ घाईने पुढे काढण्याचा प्रयत्न केल्यास चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोलिसांसाठी मिरवणुकीचा कालावधी कमी करण्यापेक्षा गर्दीचे सुरक्षित व्यवस्थापन अधिक महत्त्वाचे आहे. वेळेशी तुलना करण्याची परंपरा खंडित करणे कितपत योग्य आहे? वेळेसंदर्भात मंडळे आणि संबंधीत व्यक्तींनी निर्णय घेणे योग्य असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. सुरुवातीला मानाचे गणपती मिरवणुकीत दाखल झाले. त्या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे मिरवणुकीच्या पुढील प्रवाहावर त्याचा परिणाम झाला आणि काही प्रमाणात विलंब झाला. शहरातील अनेक चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती, अशा परिस्थितीत सुरक्षिततेला प्राधान्य देऊन पोलिसांनी निर्णय घेतल्याचे अमितेशकुमार यांनी सांगितले.

आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्यावर कारवाई होणारच

यंदा मागील वर्षाच्या तुलनेत ध्वनिमर्यादेचे अधिक पालन झाल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. मात्र, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. डीजेच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी डेसिबल तपासणीचा प्रयत्न करण्यात आला आहे. दि. २४ सप्टेंबरपर्यंत ध्वनिप्रदूषणासंदर्भात २१ गुन्हे दाखल करण्यात आले असून, इतर ४०० प्रकरणांत भंग झाल्याचे निदर्शनास आले असून, त्यांच्यावर कार्यवाही सुरू आहे. तसेच मागील दोन दिवसांतील रिडींग घेतले असून, लवकरच उल्लंघन केलेल्यांची संख्या कळले.

बापट यांच्या नाराजीची दखल घेणार

डीजे आणि ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावरून विद्यानंद बापट यांनी व्यक्त केलेल्या नाराजीबाबतही पोलिस आयुक्तांनी प्रतिक्रिया दिली. बापट यांच्या नाराजीची माहिती घेण्यात येईल. त्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबाबत आवश्यक ती कारवाई केली जाईल. तसेच, विसर्जन मिरवणुकीमुळे काही सामान्य नागरिकांना त्रास झाला असेल, तर त्याबद्दल खेद व्यक्त करतो, असे अमितेशकुमार यांनी सांगितले.

विसर्जन मार्गावर 'मॅन-टू-मॅन' बंदोबस्त

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलिस आयुक्त संजय दराडे यांनी बंदोबस्ताची आखणी केली होती. बंदोबस्ताचा ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला होता. गर्दी व्यवस्थापनापासून ते विसर्जन मार्गावर 'मॅन-टू-मॅन' बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मागील वर्षीच्या गणेशोत्सवातील बंदोबस्ताचे विश्लेषण करून यंदाच्या नियोजनातील त्रुटी दूर केल्या होत्या. दोन-तीन गणेशोत्सवांच्या बंदोबस्तात सहभागी झालेल्या अधिकारी व अंमलदारांशी सविस्तर चर्चा करून गर्दीचा पॅटर्न, गर्दी वाढण्याची प्रमुख ठिकाणे, मेट्रोच्या पीक अवर्समध्ये होणारी गर्दी तसेच गर्दीच्या हालचालीतील अडथळ्यांचा अभ्यास केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT