

Pune Ganpati Visarjan 2026: पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्साह शिगेला पोहोचला असून शहरातील प्रमुख रस्त्यांवर गणेश मंडळांच्या मिरवणुका सुरू आहेत. ढोल-ताशांच्या गजरासोबत अनेक मंडळांनी डीजेचा मोठा आवाज केला आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले असून डीजेच्या तालावर कार्यकर्ते नाचताना दिसत आहेत.
विविध गणेश मंडळांचे रथ आणि गणेशमूर्ती विसर्जनासाठी ठरलेल्या मार्गाने पुढे सरकत आहेत. मात्र, अनेक ठिकाणी मिरवणुका संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे. अलका चौक परिसरातून मिरवणुका पुढे जात असल्या तरी टिळक रस्त्याच्या दिशेने मिरवणुकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
गणेश विसर्जन मिरवणुका वेळेत पूर्ण करणे हे पोलिस आणि प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. मागील वर्षी विसर्जन मिरवणुका पूर्ण होण्यासाठी तब्बल ३६ तासांचा कालावधी लागला होता. यंदा हा कालावधी कमी करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असले, तरी सध्याची परिस्थिती पाहता मिरवणुका आणखी लांबण्याची शक्यता दिसत आहे.
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या आवाजाचा मुद्दा यंदाही चर्चेत राहिला. गेल्या काही दिवसांपासून डीजेच्या वापरावरून विविध स्तरांवर चर्चा सुरू होती. मात्र, विसर्जन मिरवणुकीत अनेक गणेश मंडळांनी डीजेला प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळत आहे.
अलका चौक परिसरात डीजेच्या मोठ्या आवाजामुळे वातावरण अक्षरशः दणाणून गेले आहे. मंडळांचे कार्यकर्ते डीजेच्या तालावर नाचताना दिसत आहेत.
याचदरम्यान, डीजेच्या मोठ्या आवाजाचा त्रास होऊ नये यासाठी काही वरिष्ठ पोलिस अधिकारी कानाला हेडफोन लावून बसल्याचे दृश्य पाहायला मिळाले. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीतील डीजेच्या आवाजाची तीव्रता पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे.
दरम्यान, पुण्यातील विविध भागांत विसर्जन मिरवणुका सुरू असून बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली आहे. मिरवणुका सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.