

पुणे: यंदा सामान्य नागरिकांनी डीजेला प्रखर विरोध करूनही त्याचा कोणताही परिणाम यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीवर दिसला नाही. उलट चार टॉप, चार बेसमधूनही आवाजाच्या मर्यादेची पातळी २०० ते २५० डेसिबल्स पार झाल्याचे टीम ‘पुढारी’च्या पाहणीत आढळले. शुक्रवारी सकाळी १० ते रात्री १२ आणि शनिवारी सकाळी ६ नंतर डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने शहर दणाणून गेले होते.
टीम ‘पुढारी’ने शनिवारी सकाळी ६ ते ७.३० या वेळेत केलेल्या सर्वेक्षणात १२ हजार पावले चालत डीजेच्या आवाजाची मर्यादा तपासली तेव्हा हे वास्तव दिसून आले. प्रामख्याने शनिवारी रात्री १२ नंतर डीजेचा आवाज बंद झाला, तरी काही मंडळांनी लाउडस्पिकर लावून रात्री १ वाजता आरती केल्याचे दिसून आले. पोलिसांनी आवाहन करूनही रात्री १२ च्या वेळेचे पहिले उल्लंघन झालेले दिसून आले.
डीजे बंद होताच रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत ढोल वादन सुरू होते. लक्ष्मी रस्त्यावर एका पथाकात ५० पेक्षा जास्त ढोल होते. तर, काही मंडळांत तीन-तीन ढोल-ताशे पथक असल्याने तो आवाजही कानाला असह्य होत होता. सकाळी ६ च्या अगोदरच डीजेचा दणदणाट पुन्हा सुरू झाला. त्यानंतर अवघी मंडळे पुन्हा रोमांचित झाली. लेझर लाईटसह डीजेवर तरुणाई थिरकू लागली. संपूर्ण लक्ष्मी रस्ता अन् परत टिळक रस्त्याने अलका चौक अशी १२ हजार पावले टीम ‘पुढारी’ चालत आली. या संपूर्ण प्रवासात कानावर हात झाकूनच यावे लागले. कानावरून हात निघाले, तर असह्य वेदना अन, कान बधिर झाल्याचे जाणवत होते.
डीजेचा केयॉस झाल्याने कर्णकर्कशता
सकाळी ६ वाजता एकाच वेळी सर्वच मंडळाचे डीजे पुन्हा एकदा सुरू झाले. प्रत्येकाची गाणी वेगळी अन् अंतर कमी असल्याने चार टॉप, चार बेस असूनही आवाजाचा केयॉस तयार झाला. त्यातूनच ध्वनिमर्यादेचे उल्लंघन झालेले आढळून आले. हा आवाज २०० ते २५० डेसिबल्स पार गेला होता. एकूणच विद्यानंद बापट सारख्या समान्य नागरिकाने यंदा डीजेला प्रखर विरोध करूनही जे व्हायचे तेच झाले, अशी चर्चा रंगल्याचे दिसून आले.
'बेस-टॉप'चा शब्दच्छल थांबवा: विद्यानंद बापट
विसर्जन मिरवणुकीतील ध्वनिप्रदूषण कमी झाल्याचा पोलिसांचा दावा विद्यानंद बापट यांनी फेटाळून लावला. 'बेस आणि टॉप'च्या संख्येवर चर्चा करण्याचा शब्दच्छल थांबवला पाहिजे, अशा स्वरुपाची तीव्र नाराजी डीजे आणि कृत्रिम ध्वनिवर्धकांच्या वापरावर बापट यांनी व्यक्त केली. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ध्वनिप्रदूषणाच्या प्रश्नावर प्रशासनाच्या भूमिकेबाबत आपले मत व्यक्त केले.
विसर्जन मिरवणुकीनंतर पोलिसांकडून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आवाज कमी असल्याचा दावा करण्यात आला. मात्र, नारायण पेठ, केळकर रस्ता, लक्ष्मी रस्ता आणि बाजीराव रस्ता परिसरात यंदाही मोठ्या आवाजात डीजे वाजत होते. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला असून, मिरवणुकीनंतरही तक्रारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 'चार बेस आणि चार टॉप' अशा मर्यादांवर चर्चा करण्याऐवजी ध्वनिवर्धकांच्या वापरावरच नियंत्रण आणणे गरजेचे आहे. सणांच्या नावाखाली ध्वनिवर्धकांना परवानगी देण्याची कायद्यातील पळवाट मुळापासून बंद केली पाहिजे. पोलिसांनी घटनास्थळीच ध्वनिवर्धक जप्त करून कारवाई करायला हवी होती, असे बापट यांनी स्पष्ट केले. ध्वनिप्रदूषणामुळे अनेक नागरिकांनी सणाच्या काळात शहराबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. नागरिकांना शांततेत जगण्याचा अधिकार असून, हा प्रश्न केवळ एका सणापुरता मर्यादित नसून वर्षातील ३६५ दिवसांचा आहे. लीप वर्षात ३६६ दिवस नागरिकांना शांततेचा अधिकार मिळाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. उत्सवाच्या नावाखाली कायद्याचे उल्लंघन होत असेल तर प्रशासनाने सक्तीने कायदा राबवावा. नागरिकांचे कान, डोके आणि हृदय सुरक्षित राहणे महत्त्वाचे आहे. कायद्यातील पळवाटा बंद करण्यासाठी कायदे मंडळ आणि न्यायपालिकेच्या माध्यमातूनही लढा सुरूच ठेवणार असल्याचे बापट यांनी सांगितले.
यंदा आव्वाज चढाच!
डीजेच्या विरोधाला ‘आव्वाज वाढव डीजे... तुला आईची शपथ हाय’ने उत्तर तसेच पारंपरिक ढोल-ताशांच्या दणदणाटासह अन्य वाद्यांमुळे लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मार्गावरील दहा चौकांतील आवाजाची पातळी यंदा १०४.५ डेसिबल नोंदवली गेली. त्यामुळे गतवर्षीच्या ९२.६ तुलनेत यंदा तब्बल ११.९ डेसिबलने पातळी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
२०१४ पासून २०२६ पर्यंत गेल्या १३ वर्षांत आवाजाची पातळी २०२२ आणि २०२३ मध्ये शंभर डेसिबलच्या पुढे होती. परंतु यंदा पुन्हा एकदा आवाजाच्या पातळीने उच्चांक गाठला. २०२२ साली १०५.२ आणि २०२३ साली १०१.२ डेसिबल ध्वनीची पातळी होती. परंतु, २०२४ ला ९४.८ आणि २०२५ ला ९२.६ अशी ध्वनिपातळी कमी झाली होती. त्यामुळे यामध्ये आणखी सुधारणा करून ध्वनिप्रदूषण कमी कसे करता येईल, यावर विचार होणे आवश्यक होते. परंतु, यंदा पुणेकर नागरिक विद्यानंद बापट यांच्यासह अन्य संघटनांनी डीजेला विरोध दर्शविला. परंतु, तरुणाईला आणि गणपती मंडळांना हे रुचले नाही.
यंदा देखील झाला होता आणि चार बेस व चार टॉपच्या पुढे बंदी घालण्यात आली होती. परंतु, यंदाचे ध्वनिप्रदूषण पाहता डीजेसंदर्भातील कोणत्याही नियमावलीचा फारसा परिणाम झाला नसल्याचे स्पष्ट झाले. यंदा लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीत सरासरी १०४.५ डेसिबल ध्वनिपातळी होती. परंतु, २५ सप्टेंबरला गोखले चौकात रात्री आठ वाजता ११५.४, तर होळकर चौकात ११४ डेसिबल आणि २६ सप्टेंबरला रात्री १२ वाजता कुंटे चौकात ११३.९ डेसिबल, तर उंबऱ्या चौकात ११३.८ डेसिबल या सर्वाधिक ध्वनिपातळीची नोंद झाली आहे. सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या उपयोजित विज्ञान आणि मानव्यविज्ञान विभागातर्फे विसर्जन मिरवणुकीतील ध्वनिप्रदूषणाची दरवर्षी मोजणी करण्यात येते. यंदा या उपक्रमाचे २६ वे वर्ष होते. सीओईपीच्या उपयोजित विज्ञान आणि मानव्यविद्या विभागाचे प्रमुख डॉ. महेश शिंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे नियोजन मेहेर आणि आयुष यांनी केले.
लक्ष्मी रस्त्यावरील प्रमुख चौकांतील नोंदी
शुक्रवारी (दि. २५) दुपारी बारा ते शनिवारी (दि. २६) सकाळी आठ या वेळेत लक्ष्मी रस्त्यावरील प्रमुख चौकांत ध्वनिपातळीच्या नोंदी घेण्यात आल्या. त्यानुसार शुक्रवारी दुपारी बारा वाजता सरासरी ९८.७ डेसिबल, सायंकाळी चार वाजता सरासरी ११३.४ डेसिबल, रात्री आठ वाजता १११.९ मध्यरात्री १२ वाजता ११२.६ डेसिबल, पहाटे चार वाजता १०५.१ डेसिबल, सकाळी आठ वाजता ८५.२ डेसिबल ध्वनिपातळी नोंदवली गेली.
काय आहेत केंद्रीय प्रदूषण मंडळाचे निकष...
केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या निकषांनुसार दिवसा निवासी क्षेत्रात 55 डेसिबल, औद्योगिक क्षेत्रात 75 डेसिबल, व्यापारी क्षेत्रात 65 डेसिबल, तर शांतता क्षेत्रात 50 डेसिबल, तर रात्रीच्या वेळी निवासी क्षेत्रात 45 डेसिबल, औद्योगिक क्षेत्रात 70 डेसिबल, व्यापारी क्षेत्रात 55 डेसिबल, तर शांतता क्षेत्रात 40 डेसिबल ध्वनिपातळी असणे अपेक्षित आहे. परंतु, विसर्जन मिरवणुकीच्या उत्साहात या मर्यादा धुडकावण्यात आल्याचे ध्वनिप्रदूषणाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
‘बापट पॅटर्न’ पुणेकरांनी धुडकावला
पुणेकर नागरिक विद्यानंद बापट यांनी ध्वनिप्रदूषणाविरोधात घेतलेली भूमिका आणि डीजेला त्यांचा असलेला विरोध पाहता यंदा डीजे कमी प्रमाणात वाजतील, अशी अपेक्षा होती. परंतु, यंदाचे गतवर्षीच्या तुलनेतील उच्चांकी ध्वनिप्रदूषण पाहता पुणेकरांनी ‘बापट पॅटर्न’ अक्षरश: धुडकावल्याचे स्पष्ट झाले आहे.
मिरवणूक मार्गावरील चौक - ध्वनिपातळी (डेसिबलमध्ये)
(२५ सप्टेंबर दुपारी 12 ते २६ सप्टेंबर सकाळी 8)
बेलबाग - १०४
गणपती - १०३.३
लिंबराज - १०३.५
कुंटे - १०२.८
उंबऱ्या गणपती - १०४.१
गोखले - १०४.४
शेडगे विठोबा - १०६.३
होळकर - १०६.८
टिळक - १०५.५
खंडूजीबाबा - १०४.२
एकूण सरासरी - १०४.५