Fort Making Pudhari
पुणे

Pune Fort Making Competition: पुण्यात बालचमूंच्या हातून साकारताहेत शिवकालीन गडकिल्ले; ३२ व्या किल्ले स्पर्धेची लगबग

संभाजी महाराज उद्यानात सिंहगड, राजगड, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्गाच्या प्रतिकृती; मुलांच्या कल्पकतेला आणि इतिहासाच्या अभ्यासाला मिळतोय वाव

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कुणाच्या हातात माती अन्‌ विटा, कुणाच्या हातात किल्ल्याचा नकाशा, तर कुणाच्या डोक्यात बुरूज आणि तटबंदीची आखणी... कुणी मित्रांबरोबरीने सिंहगडाची प्रतिकृती साकारण्यात रमलेले, तर कुणी पद्मदुर्गाची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात मग्न... छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची आणि हिंदवी स्वराज्याच्या इतिहासाची साक्ष देणारे गडकिल्ले साकारताना मुलांसह तरुणाईचे अवघे विश्वच गडकिल्ल्यांनी व्यापले आहे. कागदावरील नकाशांच्या आधारे किल्ल्यांचा इतिहास जाणून घेत त्याला प्रत्यक्ष आकार दिला जात आहे.

सिंहगड, राजगड, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग, असे विविध ऐतिहासिक गडकिल्ले उभारण्यासाठी त्यांची लगबग सुरू आहे. मातीने माखलेले हात, चेहऱ्यावरचा उत्साह आणि मित्रांसोबतच्या गप्पा, असे उत्साही वातावरण छत्रपती संभाजी महाराज उद्यानात आहे. या उपक्रमामुळे मिळतोय मुलांच्या अन्‌ तरुणाईच्या कल्पकतेला, जिद्दीला वाव अन्‌ शिवकालीन इतिहास जाणून घेण्याची संधीही.

पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने गुरुवारपासून (दि. ५) ३२ व्या किल्ले स्पर्धा आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात किल्ले उभारण्याची लगबग सुरू झाली आहे. महापालिकेकडून उपलब्ध करून दिलेल्या साहित्यातून मुले आणि तरुणाई गडकिल्ले साकारत असून, आपल्या जिद्दीच्या, कल्पकतेच्या जोरावर मातीतून किल्ले साकारण्याचा आनंद ते घेत आहेत. किल्ल्याची निवड करण्यापासून ते त्याची प्रतिकृती तयार करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर त्यांच्यात उत्साह दिसून येत आहे.

सिंहगड किल्ल्याची प्रतिकृती साकारणारे स्मरण इंगळे, ऋतुराज ढगे आणि कार्तिक म्हणाले, ''आम्ही सिंहगड किल्ला पाहिला आहे. त्यामुळे यंदा या किल्ल्याची प्रतिकृती बनविण्याचे ठरवले आणि कामाला लागलो. मागील वर्षी आम्ही राजगड साकारला होता. यंदा सिंहगड साकारत आहोत. आम्ही सगळे मित्र एकमेकांच्या मदतीने किल्ला साकारत आहोत आणि किल्ल्याची रचना समजून घेऊन ती प्रत्यक्षात उभी करण्याचा अनुभव आनंददायी आहे.'' सहावीत शिकणारे अली शेख आणि ईशान वाळके दोघेही पद्मदुर्गची प्रतिकृती साकारत आहेत. मित्रांच्या सोबतीने ते ही प्रतिकृती साकारत असून, त्यांच्या चेहऱ्यावर कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे.

कल्पनेतील किल्ला प्रत्यक्षात साकारण्याचा प्रयत्न

दिग्विजय मोरे म्हणाला, आम्ही मित्र सुवर्णदुर्गाची प्रतिकृती साकारत आहोत. गेल्या दोन दिवसांपासून काम सुरू आहे. माझे मित्र आयुष आटोळे, विवेक आटोळे, सोहम गावडे आणि वेदांत चांदणे हेही गडकिल्ले साकारत आहेत. किल्ल्याची भौगोलिक रचना, तटबंदी, प्रवेशद्वार आणि बुरुजांचा अभ्यास करून त्यांनी कामाची विभागणी केली आहे. नकाशे आणि पुस्तकांमधून माहिती मिळवून कल्पनेतील किल्ला प्रत्यक्षात साकारण्याचा प्रयत्न सुरू आहे.'

गेल्या ३२ वर्षांपासून पालिकेच्या वतीने किल्ले स्पर्धा, प्रदर्शनाची परंपरा जपली जात आहे. यंदाही मुलांसह तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत आहे. स्पर्धकांना किल्ले उभारण्यासाठी माती, विटा, दगड उपलब्ध करून देण्यात येत आहे. किल्ल्यांची रचना समजून घेण्यापासून ते प्रत्यक्ष प्रतिकृती उभारण्यापर्यंत मुले उत्साहाने सहभागी होत आहेत.
अशोक घोरपडे, उद्यान अधीक्षक, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT