Tukaram Mundhe Pudhari
पुणे

Pune FDA Action: एफडीएच्या धडक कारवाईचा पुण्यात मोठा परिणाम! हॉटेलमधून भजी गायब, मेन्यू बदलले; तरीही टपऱ्यांकडून नियमांना केराची टोपली

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईनंतर अनेक हॉटेल सावध; सात परवाने निलंबित, मात्र छोट्या खाद्यव्यवसायिकांकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरातील काही हॉटेलांमध्ये खाद्यपदार्थांचे रंग उडाले. कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर हेअर नेट आले. काही हॉटेलच्या मेन्यूमधून भजीसारखे पदार्थ गायब होऊन मेन्यू कार्ड आक्रसली, अस्वच्छतेला चाप बसला. परवाने रद्द करीत हॉटेल बंद करण्याचा सपाटा लावणाऱ्या अन्न व औषध प्रशासन खात्याचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवायांचा हॉटेल व्यावसायिकांनी चांगलाच धसका घेतल्याचे चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे टपरीचालक व छोट्या हॉटेल व्यावसायिकांनी मात्र त्यांच्याकडे काणाडोळा करीत स्वच्छतेसह सर्वच निकष धाब्यावर बसवून त्यांच्या आदेशांचा फज्जा उडविला आहे. 'टीम पुढारी'ने शहराच्या विविध भागांत केलेल्या पाहणीत आढळून आलेली ही निरीक्षणे, हेच स्पष्ट करतात.

पनीर, खवा, मिठाई, तेल, मसाले, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवर एफडीएकडून मोठ्या प्रमाणावर नमुने घेऊन तपासणी सुरू असल्याने अनेक हॉटेलचालकांनी पुरवठादार बदलणे, प्रमाणित साहित्य वापरणे किंवा काही पदार्थ तात्पुरते मेन्यूमधून काढून टाकणे पसंत केले आहे. खाद्यपदार्थांची तपासणी अतिशय बारकाईने सुरू असल्याने विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर अन्नपदार्थांमधील भेसळ, निकृष्ट दर्जाचे साहित्य आणि नियमबाह्य उत्पादनांवर कठोर कारवाई सुरू केल्यानंतर अनेक हॉटेल, ढाबे आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी काही पदार्थ विक्रीतून कमी केले किंवा तात्पुरते बंद केल्याचे दिसून आले आहे. पर्वती भागात अनेक ठिकाणी भजी, वडापाव, साबूदाणा वडा असे खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल्स दाटीवाटीने उभारलेले आहेत. त्याखेरीज हातगाडी विक्रेते, छोटे रेस्टॉरंट व हॉटेलही आहेत. या साऱ्यांची दररोजच तपासणी सुरू असल्याची चर्चा आहे.

एफडीएने विशेष लक्ष केंद्रित केलेले पदार्थ

दूध, पनीर, खवा, तूप, खाद्यतेल, मसाले, मिठाई, बेकरी पदार्थ, मांसाहारी पदार्थ, पिण्याचे पाणी.

...हे पदार्थ मिळेनात

  • कृत्रिम रंगांचा वापर असलेली चटणी, सॉस आणि ग्रेव्ही.

  • सिंथेटिक दूध किंवा निकृष्ट खवा वापरून बनविलेल्या मिठाई

  • पनीरचे बनावट किंवा स्टार्चयुक्त पर्याय वापरून तयार होणारे पदार्थ.

  • कृत्रिम रंग असलेले गोळे, ज्यूस, कुल्फी आणि आईस्क्रीम.

  • पुन:पुन्हा वापरलेल्या तेलात बनविलेल्या भजी, वडा, सामोसे, तळलेले पदार्थ.

  • निकृष्ट दर्जाचे चीज किंवा बनावट बटर वापरणारे फास्ट फूड पदार्थ.

शहरातील चित्र

  • अन्न व औषध प्रशासनाने पुणे शहरात महिनाभरात सुमारे ७० हॉटेल आणि रेस्टॉरंटची तपासणी केली.

  • स्वच्छतेचे नियम न पाळणे, मुदतबाह्य अन्नपदार्थ आणि अन्नसुरक्षा कायद्याचे उल्लंघन आढळल्याने सात आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले.

  • या कारवाईनंतर अनेक हॉटेलांनी आपल्या मेन्यूमधून बरेच पदार्थ कमी केले.

  • पनीर टिक्का, पनीर बटर मसाला.

  • खव्यापासून बनणाऱ्या मिठाया.

  • चीजयुक्त फास्ट फूड (निकृष्ट चीजचा संशय).

  • निकृष्ट लस्सी, श्रीखंड आणि काही दुग्धजन्य पदार्थ.

  • कृत्रिम रंग वापरून बनवलेले ज्यूस, कुल्फी आणि आईस्क्रीम.

  • पुन:पुन्हा वापरलेल्या तेलात बनवलेले सामोसे, भजी, वडा आणि फ्राय पदार्थ.

एफडीएने या भागात केली कारवाई

  • सिंहगड रस्ता हॉटेल : 3 | आंबेगाव हॉटेल :1

  • वाघोली बिर्याणी हाऊस : 2 | बावधन बिर्याणी हाऊस : 1

  • मार्केट यार्डमधील एका खाद्यपदार्थ विक्रेत्याचे दुकान सील करण्यात आले.

  • शुक्रवार पेठेतील एका आयुर्वेदिक दुकानातून सुमारे ५० लाखांचा संशयित औषधसाठा जप्त करण्यात आला.

  • राज्यात पुणे शहरातून सर्वाधिक अन्न भेसळ आणि अन्नसुरक्षा तक्रारी येत असल्याने तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.

विद्यापीठातून भजी गायब; पदार्थांचा रंगही बदलला

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध खानावळी तसेच फुडमॉलमधील काही गाळ्यांमधून खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी भजी तसेच वारंवार तळावे लागणारे पदार्थ विकणे बंद केले आहे. तर, पदार्थांचे रंगही बदलण्यात आले आहेत. आता बुंदीला तसेच भाताला लाल रंग दिला जात नाही. अन्न व औषध प्रशासन विभाग अर्थात एफडीएची कारवाई होईल, या भीतीपोटी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

अन्न व औषध प्रशासन विभाग अर्थात एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा पदभार घेतल्यानंतर राज्यात धडक कारवाईचे सत्र सुरू झाले आहे. अन्नपदार्थांची विक्री करताना ज्या नियमावलींचे कडक पालन करणे गरजेचे आहे, त्या नियमावलीला खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून केराची टोपली दाखविण्यात येत होती. त्यामुळेच एफडीएने कारवाईचा धडाका सुरू केला. एफडीएच्या धडक कारवाईचा दणका विद्यापीठाच्या रिफेक्ट्रीला देखील बसला आहे. विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर विद्यापीठाच्या रिफेक्ट्रीला आता टाळे ठोकण्यात आले आहे.

त्यामुळे विद्यापीठातील अन्य खानावळी चालविणारे तसेच हॉटेलचालक आणि फुडमॉलमधील गाळेधारक सावध झाले असून, त्यांनी वारंवार तळाव्या लागणाऱ्या पदार्थ्यांची विक्रीच बंद केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे विद्यापीठात आता भजी तसेच पुरी-भाजी हे पदार्थ विकणे बंद केले आहे. त्याचबरोबर चायनीज पदार्थ विकताना रंग टाकणे देखील बंद केले आहे, तर बुंदीचा लाल रंग देखील बंद झाल्याचे दिसून आले आहे. एफडीएच्या कारवाईच्या भीतीपोटी अनेक हॉटेल व्यावसायिक वठणीवर आले असले, तरी अद्याप अनेक हॉटेलवाले आणि फुडमॉलमधील गाळेधारक नियमांची पायमल्ली करीत आहेत. त्यामुळे त्यांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी विद्यापीठातील विद्यार्थी तसेच विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT