Fake Medicine Pudhari
पुणे

Pune Fake Alburel Medicine: ‘ॲल्ब्युरेल’ बनावट औषध विक्रीचा भंडाफोड; पाच ठोक विक्रेत्यांवर गुन्हा

पुणे, मुंबई, नागपूर आणि रायगड येथील वितरकांवर कारवाई; अन्न व औषध प्रशासनाच्या तपासात गंभीर प्रकार उघड

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुण्यात ॲल्ब्युरेल नावाच्या बनावट औषधाची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी पाच वितरक-पुरवठादारांवर गुन्हा दाखल केला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या तपासात ॲल्ब्युरेल नावाचे बनावट औषध बाजारात विक्री होत असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पुणे, मुंबई, नागपूर आणि रायगड येथील पाच ठोक विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या रॅकेटचा भंडाफोड औषध निरीक्षक श्रुतिका जाधव यांच्या फिर्यादीवरून झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्याच्या पुणे विभागात कार्यरत असलेल्या औषध निरीक्षक श्रुतिका जाधव यांनी 28 जुलै 2025 रोजी सदाशिव पेठ येथील मे. मैत्री फार्मास्युटिकल्स येथे तपासणी केली. तेथून ॲल्ब्युरेल व रिच्युएक्सरेल या औषधांचे नमुने घेऊन ते शासकीय विश्लेषक, मुंबई यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले.

शासकीय विश्लेषकांच्या अहवालानुसार ॲल्ब्युरेल हे औषध चाचणीमध्ये अपयशी ठरले असून, ते औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 च्या कलम 17 (ब) अन्वये बनावट घोषित करण्यात आले आहे. तपासादरम्यान या बनावट औषधाची खरेदी-विक्री साखळीत मे. मैत्री फार्मास्युटिकल्स (सदाशिव पेठ, पुणे), मे. श्री साई लॉजिस्टिक (नागपूर), एम/एस नेक्सस लाईफकेअर प्रा. लि. (दादर (पूर्व), मुंबई), एन आर एक्स डिस्ट्रिब्युटर्स एलएलपी ( सायन, मुंबई), एम/एस आरआरटी फार्मा (कामोठे, रायगड) या सर्वांनी संगनमत करून बनावट औषधांची खरेदी-विक्री केल्याचा आरोप आहे. बनावट औषधावर उत्पादक म्हणून नमूद असलेल्या रिलायन्स लाईफ सायन्स प्रा. लि. (नाशिक) यांनी लेखी पत्राद्वारे संबंधित बॅचचे उत्पादन त्यांनी केले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

त्यामुळे हे औषध पूर्णतः बनावट असल्याचे अधिकृतपणे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरआरटी फार्माचे मालक रितेश ठोंबरे यांच्याविरुद्ध यापूर्वीही बनावट औषध विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक (गुन्हे) घोडके करीत आहेत. बनावट औषधाचे उत्पादन नेमके कोठे आणि कोणाकडून झाले, याचा सखोल तपास सुरू आहे.

बनावट औषधनिर्मिती; आरोग्याशी मात्र खेळ

वैद्यकीय उपचारांमध्ये वापरले जाणारे ॲल्ब्युरेल हे महत्त्वाचे औषध असल्याने, त्याचे बनावट स्वरूप बाजारात फिरत असल्याची बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. या रॅकेटमुळे रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, शासनाचीही आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरातील औषधविक्रेत्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, संशयास्पद औषधांची माहिती तत्काळ प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे औषध यकृत व इतर गंभीर आजारांसाठी वापरले जाते असल्याची माहिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT