Liquor  Pudhari
पुणे

Pune Liquor Smuggling: पुण्यात मद्य तस्करी टोळीचा पर्दाफाश

गोव्याहून आणलेले मद्य ड्रममध्ये भरून विक्री; 20 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गोव्यातील स्वस्त मद्य प्लास्टिक ड्रममध्ये भरून आणून महाराष्ट्रात नामांकित बँडच्या बाटल्यांमधून चढ्‌‍या दराने विक्री करणाऱ्या टोळीचा राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने पर्दाफाश केला आहे. भरारी पथकाने या टोळीचा थरारक पाठलाग करून इंदापुरातून दोघांना जेरबंद केले आणि त्यांच्याकडून 20 लाख 53 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यांत छापे टाकून तस्करीची साखळीच उखडून टाकली आहे.

कांदलगाव (ता. इंदापूर) हद्दीत मद्यतस्करी होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार 27 मार्च रोजी कांदलगाव ते शहा रस्त्यावर एका मालवाहू वाहनाला अडविण्यात आले. या वाहनाची झडती घेतली असता त्यात मद्याने भरलेले 25 प्लास्टिक ड्रम आणि रॉयल स्टॅग व्हिस्कीची 1 हजार 400 बनावट बूच मिळून आले.

या कारवाईत प्रेम सोमनाथ भडवलकर (रा. बारामती), अक्षय अधिकराव देशमुख (रा. सोलापूर) या दोघांना जागेवर अटक करण्यात आली. यानंतर आरोपी अक्षयच्या माढा येथील घरावर छापा टाकून सुमारे 49 हजार रुपयांचा साठा आणि सातारा जिल्ह्यातील महिमानगड येथे फरारी आरोपीच्या घरावर छापा टाकून ‌‘इम्पेरिअल ब्लू‌’ व्हिस्कीच्या बाटल्या आणि बूच जप्त करण्यात आले.

या कारवाईमुळे आंतरजिल्हा मद्यतस्करीची मोठी साखळी उखडून टाकण्यात एक्साइज विभागाला यश आले आहे. उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, पुणे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अशोक शितोळे, सत्यवान गोगावले, दुय्यम निरीक्षक सागर साबळे, प्रदीप झुंजरुक यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

गोवा बनावटीचे मद्य ड्रममध्ये भरून त्याची राज्यात छुप्या पद्धतीने चढ्या दराने विक्री करणे, हा शासनाचा महसूल बुडविण्याचा गंभीर प्रकार आहे. अशा प्रकारच्या अवैध तस्करीविरुद्ध आमची मोहीम यापुढेही अधिक तीव केली जाईल.
अतुल कानडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT