

बाणेर: बाणेर-बालेवाडी परिसरातील पाणी प्रश्नाबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयात नुकतीच बैठक पार पडली. या वेळी परिसराला 9 एमएलडी पाण्याची गरज असताना महापालिकेकडून केवळ 6 एमएलडी पाणीपुरवठा केला जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यावर विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी याबाबत पुढील बैठकीत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही बैठक घेण्यात आली. या बैठकीला परिसरातील सोसायट्या आणि बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. परिसरातील पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न या वेळी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिला.
बाणेर-बालेवाडी परिसरातील अनेक सोसायट्यांना महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. यामुळे नागरिकांना टँकर आणि बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. सध्या रहिवासी दररोज सुमारे 300 टॅंकर पाणी खरेदी करीत आहे. पाण्याच्या टँकरसाठी सोसायट्यांचा वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च होत आहे.
परिसरात नव्या गृहनिर्माण प्रकल्पांमुळे 25 ते 30 हजार नागरिकांची वाढ होणार असल्याने आगामी काळात पाणी प्रश्न आणखी गंभीर होणार आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने दीर्घकालीन पाणीपुरवठा आराखडा (डीपीआ) तयार केला नाही. या भागाला दररोज 9 एमएलडी पाण्याची गरज असताना केवळ 6 एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. ही तूट महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही मान्य असल्याचे या वेळी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
विभागीय आयुक्तांनी या मुद्द्यांवर पुढील बैठकीत सविस्तर स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश या वेळी महापालिका प्रशासनाला दिले. तसेच वार्डस्तरावर नागरिकांसोबत पाणी प्रश्नावर नियमित बैठक घेतली जात नसल्याचे मोरेश्वर बालवडकर यांनी सांगितले. त्यावर मोहल्ला कमिटीच्या माध्यमातून बैठका आयोजित करण्याचे आदेश आयुक्तांनी महापालिकेला दिले. या वेळी बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनतर्फे यश चौधरी, आशिष कोटमकर यांनी भूमिका मांडली. रमेश रोकडे, दफेदार सिंह, शैलेश पाटील, ओमप्रकाश वानखेडे यांच्यासह महापालिका प्रशासनाचे अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.