Liquor Pudhari
पुणे

Pune Dry Day Illegal Liquor Sale: ‘ड्राय डे’ला पुण्यात अवैध मद्यविक्रीवर धडक; ६४ गुन्हे, ६२ आरोपी अटकेत

३,१०० लिटर रसायनासह मद्यसाठा जप्त; पुणे, पिंपरी-चिंचवड व मावळात १४.३१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गणेश विसर्जनाच्या दिवशी 'ड्राय डे' असतानाही छुप्या पद्धतीने मद्यविक्री आणि अवैध मद्यनिर्मिती करणार्‍यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडसह परिसरात विविध ठिकाणी छापे टाकून ६४ गुन्हे दाखल करीत ६२ आरोपींना अटक करण्यात आली.

या कारवाईत विविध प्रकारच्या मद्यासह ३,१०० लिटर रसायन आणि ६ वाहने जप्त केली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १४ लाख ३१ हजार ९५ रुपये आहे. पुणे शहरात मार्केट यार्ड, स्वारगेट, लक्ष्मीनगर, गुलटेकडी, पौड फाटा, धायरी, नर्‍हे आदी भागांत उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी कारवाई केली. या कारवायांमध्ये ३९ गुन्हे दाखल करून ३८ जणांना अटक केली.

त्यांच्याकडून ७१ लिटर हातभट्टी दारू, १५१.४७ लिटर देशी मद्य, ४१.७८ लिटर विदेशी मद्य, २४.६५ लिटर बिअर आणि आठ लिटर ताडी असा मद्यसाठा जप्त करण्यात आला. पाच वाहनेही ताब्यात घेण्यात आली. तर, पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरात ताथवडे, रामनगर, बालाजीनगर, भीमशक्तीनगर, दिघी बसस्टॉप परिसर, डोंगरगाव आणि सणसवाडी येथे कारवाई करण्यात आली.

या कारवाईत २५ गुन्हे दाखल करून २४ जणांना अटक केली. पथकांनी १८० लिटर गावठी दारू, ३१०० लिटर रसायन, २१९.३७ बल्क लिटर देशी दारू, १९.५८ बल्क लिटर विदेशी दारू आणि ७०.६७ बल्क लिटर बिअर जप्त केली. एक चारचाकी वाहनही ताब्यात घेण्यात आले. या कारवाईतील मुद्देमालाची किंमत ९ लाख ५५ हजार ९५५ रुपये आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपूर्ण पुण्यात मद्यविक्री बंद ठेवण्यात आली होती.

विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी, तसेच संवेदनशील भागांत अवैध मद्यविक्री आणि वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने विशेष पथके तैनात केली होती. उत्पादन शुल्क पुणे एकचे अधीक्षक अतुल कानडे, पुणे दोनचे अधीक्षक रविकिरण कोले यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT