

पुणे: पुण्याच्या गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावरून विद्यानंद बापट या नागरिकाने उठवलेल्या आवाजाचे पडसाद राज्यभर उमटल्याने यंदाच्या गणेशोत्सवात काहीतरी सकारात्मक घडेल, ही निर्माण झालेली अपेक्षा पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत धुळीला मिळाल्याचे पाहायला मिळाले. स्पीकरच्या भिंतींनी कानांचे बसत असलेले दडे, मानाच्या मोजक्या गणपतींनी खाल्लेला भरपूर वेळ, पथकांनी अनेक चौकांमध्ये वेळेची मर्यादा ओलांडून केलेले वादन, दोन मंडळांमध्ये अंतर पडत असताना पोलिसांची बघ्याची भूमिका अशा अनेक कारणांमुळे गेल्या अनेक वर्षांतील मिरवणुकांप्रमाणेच रखडलेली, सामान्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारी अन् रंजनाऐवजी त्रासच देणारी अशीच ही मिरवणूक ठरली.
विसर्जन मिरवणुकीची ही रखडपट्टी तिच्या सुरुवातीपासूनच सुरू झाली. मिरवणूक सकाळी साडेनऊला सुरू होईल, असे जाहीर करण्यात आले होते, मात्र पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या मानाच्या पहिल्या कसबा गणपतीलाच वेळेवर पोहोचण्यात अडथळा निर्माण झाला. काही मंडळांच्या पथकांचा आणि माननीयांच्या वाहनांच्या ताफ्यामुळे साडेनऊची मिरवणूक दहाला सुरू झाली. त्यानंतर मानाच्या गणपतींनी मिरवणुकीचे साडेआठ तास घेतले.
प्रत्येक गणपती मंडळापुढे दोनच पथकांना देण्यात आलेल्या परवानगीचे पालन बहुतांश मंडळांनी केले. तरीही काही मंडळांनी चार-चार पथके मिरवणुकीत आणली होती. या मोठ्या मंडळांचा वेगही संथ होता. त्यामुळे मिरवणुकीला आणखी वेळ लागला. पथकांच्या संख्येचा आदेश पाळला गेलेला असला, तरी प्रत्येक चौकात दहा मिनिटेच वादनास दिलेली परवानगी मंडळांनी धुडकावून दिली. काही ठिकाणी तर अर्धा तास वादन होत असल्याचे पाहायला मिळाले. मिरवणुकीत मुख्य कुतूहल होते ते विद्यानंद बापट यांनी उठवलेल्या डीजेच्या मोठ्या आवाजाचे. राज्य पातळीवरील नेत्यांनी नागरिकांना त्रास होणार नाही, असे आश्वासन दिल्याने आणि पोलिस आयुक्तांनी चार बेस आणि चार टॉपचे बंधन घालून ते ओलांडणाऱ्यांवर कारवाई करण्याची घोषणा केल्याने नागरिकांना सुखद अनुभवाची अपेक्षा होती.
तसेच उच्च न्यायालयानेही मोठ्या आवाजाने बाप्पा पावतो का? असा सवाल केल्याने ध्वनिप्रदूषणाला आळा बसेल, असेही मत व्यक्त होत होते. प्रत्यक्षात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हे सर्व आदेश धुडकावून लावत कर्णकटु आवाजाने नागरिकांच्या अपेक्षा धुळीला मिळवल्या. मिरवणुकीच्या मुख्य मार्गांवर पंचवीस धक्का पथके नेमण्याची घोषणा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केली होती. त्यामुळे मिरवणुकीच्या मार्गावर रेंगाळणाऱ्या मंडळांना वेगात पुढे सरकले जाणार आणि मिरवणूक वेळेत पूर्ण होणार, अशी चर्चा सुरू झाली होती. लक्ष्मी रस्त्यावर ही पथके दिसत होती, पण त्यांच्याकडून कार्यक्षमतेने मंडळांना पुढे सरकवण्याचे काम होत नसल्याने धक्का पथकांची घोषणा फसवीच राहिली.
डीजेच्या दणदणाट: तरीही पोलिस व प्रशासनाची चुप्पी
मिरवणुकीतील शेवटच्या मानाच्या भाऊसाहेब रंगारी, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई या गणपतींना वाट देण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले होते. त्यानुसार दगडूशेठ गणपती वेळेत मिरवणुकीत आला, पण भाऊसाहेब रंगारी आणि अखिल मंडई मंडळाला जागेवरून निघाल्यावर एका तासात बेलबाग चौकात पोहोचण्यासाठी मार्ग देण्यात येणार होता. प्रत्यक्षात मात्र काही महोत्सवी मंडळांना पोलिसांनी मध्येच प्रवेश दिल्याने हे गणपती रखडले. त्यांना मिरवणुकीत यायला विलंब झाला. त्यामुळे त्यांनाही आपली मिरवणूक संपवण्यास उशीर झाला. ध्वनिपातळीचे निकष न पाळणाऱ्या मंडळावर कडक कारवाईची भाषा करणारे पोलिस व प्रशासनही मूग गिळून गप्प राहिल्याने कार्यकर्त्यांनी डीजेच्या दणदणाटाने मिरवणूक अक्षरशः डोक्यावर घेतली आणि पुण्याची गणेश विसर्जन मिरवणूक पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली. पुण्यात गेली अनेक वर्षे २७ ते ३० तासांच्या दरम्यानचा वेळ मिरवणुकीने घेतला होता. गेल्या वर्षीची मिरवणूक तर आतापर्यंतच्या १३२ वर्षांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या इतिहासातील सर्वाधिक वेळ चाललेली मिरवणूक होती. या वर्षीचा दुसरा दिवस मावळला तरी मिरवणूक संपलेली नव्हती.