Gas Shortage Pudhari
पुणे

Pune Gas Supply: गॅसटंचाईच्या अफवांना प्रशासनाचा पूर्णविराम; पुण्यात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत

आखातातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय आढावा बैठक; रुग्णालये आणि सरकारी वसतिगृहांना गॅस पुरवठ्याला प्राधान्य

पुढारी वृत्तसेवा

पुणे : आखाती देशांमध्ये युद्धाचा भडका उडाल्यानंतर केंद्र सरकारने व्यावसायिक गॅसचा पुरवठा तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतल्याने राज्यात गॅस पुरवठ्याबाबत चिंता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव राजेश अग््रावाल यांनी गुरुवारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन गॅसपुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेतला. अत्यावश्यक सेवांमध्ये समाविष्ट असलेल्या सरकारी व खासगी रुग्णालयांसोबतच आता विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सरकारी वसतिगृहांनाही घरगुती गॅसचा पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यात घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट करीत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुख्य सचिवांनी केले. गॅसपुरवठ्याबाबत जनजागृती करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पुणे शहर व जिल्ह्यातील सर्व सरकारी वसतिगृहे तसेच खासगी व सरकारी रुग्णालयांना घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले.

दुसरीकडे, घरगुती गॅस सिलिंडरची जादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्याने जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष दक्षता पथके स्थापन केली आहेत.

जादा दराने सिलिंडर विक्री केल्यास कारवाई

“पुणे शहर आणि जिल्ह्यात घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नाही. सर्वत्र पुरवठा सुरळीत सुरू आहे. कंपन्यांनाही आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोणीही गॅस सिलिंडर जादा दराने विक्री करीत असल्यास नागरिकांनी तक्रार करावी. संबंधित वितरकांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल,” असे जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट केले.

अफवांना बळी पडू नका

पुणे : जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून, नागरिकांनी गॅसटंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व एलपीजी वितरक तसेच तेल कंपन्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, घरगुती गॅसचा पुरवठा नियमित सुरू असून, सध्या कोणतीही टंचाई निर्माण झालेली नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अलीकडे काही ठिकाणी गॅस सिलिंडरच्या तुटवड्याबाबत अफवा पसरत असल्याने नागरिकांमध्ये संभमाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेतला. तेल कंपन्या व स्थानिक गॅस वितरकांकडून मिळालेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील गॅस गोदामांमध्ये पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि नागरिकांना नियमानुसार सिलिंडरचे वितरण सुरू आहे.

वसतिगृहांना गॅस सिलिंडरचा पुरवठा प्राधान्याने करा

दरम्यान, हॉस्पिटलसारख्या अत्यावश्यक सेवा तसेच विद्यार्थ्यांच्या शासकीय वसतिगृहांना गॅस सिलिंडरचा पुरवठा प्राधान्याने करण्यात यावा, अशा सूचनाही प्रशासनाने गॅस वितरकांना दिल्या आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT