Sunetra Pawar : माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड

Malegaon Sugar Factory : कारखान्याच्या इतिहासातील पहिल्या महिला अध्यक्ष
Sunetra Pawar Elected Unopposed as Chairperson of Malegaon Sugar Factory
Published on
Updated on

शिवनगर : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.गुरुवार (दि.१२) संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी सदरची निवड जाहीर केली. यावेळी कारखान्याच्या उपाध्यक्षा संगीता कोकरे,ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे,सर्व संचालक,कार्यकारी संचालक अशोक पाटील आदींसह बहुसंख्येने सभासद शेतकरी उपस्थित होते.राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अध्यक्ष पदी विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली.

माळेगाव साखर कारखाना हा राज्यात अग्रगण्य कारखाना म्हणून ओळखला जातो. राज्यात उच्चांकी ऊस दर देणारा कारखाना म्हणून या कारखान्याची ओळख आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारखान्याच्या आठ महिन्यापूर्वी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये एक हाती सत्ता मिळवून स्वतः चेअरमन पदाची जबाबदारी घेतली होती.

मागील आठ महिन्याच्या कालावधीमध्ये अजितदादांनी स्वतः जातीने लक्ष घालून कारखान्याचा सर्वस्वी कायापालट करण्याचा निश्चय केला होता. तर राज्यातील पहिल्या पाच सहकारी साखर कारखान्यामध्ये माळेगाव कारखाना आणायचा हा दृष्टिकोन ठेवून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते.यावेळी त्यांनी कारखान्याचा एक रुपयाही न घेता काही कोटी रुपयांचा निधी आणून कारखान्यातील अंतर्गत कामकाजास सुरुवात केली होती. तर येणाऱ्या काळात कारखाना कामगार वसाहत असेल कारखान्याला जोडणारे सर्व रस्ते असतील यासाठी त्यांनी उपाययोजना सुरू केल्या होत्या.

अशावेळी अजितदादांच्या अचानक निधनाने माळेगाव कारखान्याची फार मोठी हानी झाली आहे.तथापि अजितदादांच्या पत्नी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हाती कारखान्याची धुरा सोपवण्यात आली आहे.दरम्यान अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेवून सुनेत्रा पवार या देखील माळेगाव साखर कारखान्याला राज्यातील पहिल्या पाच कारखान्यात नेऊन ठेवतील असा विश्वास सभासद शेतकरी व्यक्त करत आहेत.

कारखान्याच्या पहिल्या महिला अध्यक्ष

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ७० वर्षाच्या इतिहासात पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून सुनेत्रा अजित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर सध्या कारखान्याच्या उपाध्यक्ष पदी संगीता कोकरे या कार्यरत आहेत एकूणच माळेगाव कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्ष व उपाध्यक्ष दोन्ही पदे महिलांकडे असतील.

उपमुख्यमंत्री व कारखान्याच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी यापूर्वी विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांवर यशस्वीपणे काम केले असून, 'निर्मल वारी' आणि 'पर्यावरण रक्षण' यांसारख्या उपक्रमांमुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.

माळेगाव कारखाना हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रपंचाशी निगडित व्यवसाय आहे. सहकारा काम करत असताना राजकीय तथा पक्षीय राजकारण बाहेर ठेवून एकमेकांच्या सहकार्याने काम करणे गरजेचे आहे.जेणेकरून कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपासणे आणि पारदर्शक कारभार करणे,हीच माझी प्राथमिकता असेल.महिलांना सहकारात मोठ्या जबाबदाऱ्या मिळणे,हा स्त्रीशक्तीचा सन्मान आहे.

सुनेत्रा अजित पवार (उपमुख्यमंत्री व अध्यक्ष,माळेगाव साखर कारखाना)

आणि सुनेत्रा पवार भावनिक झाल्या

दादा... दादाच होते त्यांच्यासारखे नेतृत्व यापुढे होणे नाही माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर त्यांचे अत्यंत प्रेम होते तसेच ते कारखान्याच्या कारभाराबाबत बारकाईने लक्ष देऊन राज्यात माळेगाव कारखाना पहिल्या पाच कारखान्यात कसा राहील यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते आपण पाहिलेच आहे मागील आठ महिन्याच्या दादांच्या चेअरमन पदाच्या कार्यकालात कारखाना एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा दादांचा प्रयत्न राहिला होता तोच दादांचा प्रयत्न आपण यापुढे सर्वांच्या सहकार्याने यशस्वी करणार आहोत यावेळी सुनेत्रा पवारांना आपल्या भावना अनावर झाल्याचे पहावयास मिळाले.

सुनेत्रा पवार यांच्या पुढील आव्हाने

चेअरमन म्हणून सुनेत्रा पवार यांच्यासमोर आता कारखान्याची कार्यक्षमता वाढवणे,ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देणे आणि उपपदार्थांच्या उत्पादनातून कारखान्याची आर्थिक स्थिती अधिक भक्कम करणे,महत्वाचे म्हणजे दिवंगत उपमुख्यमंत्री व कारखान्याचे चेअरमन अजितदादांच्या दूरदृष्टीतून माळेगाव कारखाना चालवणे अशी महत्त्वाची आव्हाने असणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news