

पुणे : कोणी इलेक्ट्रीक शेगडी, इंडक्शनचा वापर सुरू केला आहे, तर कोणी शेगडीचा वापर करणार आहेत... तर कोणी डिझेल शेगड्यांचा वापर करण्याचे नियोजन करीत आहे... हे चित्र आहे टिळक रस्त्यावरील हॉटेल्समधले. व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद झाल्याचा फटका हॉटेल व्यावसायिकांनाही बसला आहे. टिळक रस्त्यावरील काही व्यावसायिकांकडे चार दिवस पुरेल इतका गॅस शिल्लक आहे, तर काहींनी एक ते दोन दिवसांसाठी हॉटेल बंद केले आहेत. हॉटेल बंद करण्याची वेळ येऊ नये म्हणून व्यावसायिकांनी विविध पर्याय शोधले असून, इंडक्शन, शेगड्यांचा वापर सुरू केला आहे, तर काही व्यावसायिकांनी गॅसच्या वापरात काटकसर सुरू केली आहे. तळलेले पदार्थ, पंजाबी खाद्यपदार्थ, इडली-डोसा, असे विविध पदार्थ बनविणे बंद केले आहे.
आखातात भडकलेल्या युद्धामुळे व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. याचा फटका राज्यभरातीलच नव्हे पुण्यातील हॉटेल व्यवसायाला बसला आहे. दै. मपुढारीफच्या प्रतिनिधीने टिळक रस्त्यावरील हॉटेल्सची पाहणी केली असता, व्यावसायिकांनी गॅसचा पुरवठा येत्या दोन ते तीन दिवसांत संपेल, त्यामुळे आम्ही विविध पर्याय शोधले असल्याचे सांगितले. गॅसचा पुरवठा संपू नये, म्हणून काही हॉटेल्स दोन दिवस बंद केली आहेत.
दुर्वांकुर डायनिंग हॉलचे संचालक आशिष मानकर म्हणाले, आमच्याकडे थाळी पद्धतीने जेवण दिले जाते. आम्हाला महिन्याला 100 ते 120 व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर पदार्थ बनविण्यासाठी करावा लागतो. दिवसाला किमान चार ते पाच गॅस सिलिंडरचा वापर पदार्थ बनविण्यासाठी होतो. पण, आताच्या परिस्थितीत फक्त तीन ते चार दिवस पुरेलइतकाच गॅस पुरवठा आमच्याकडे शिल्लक असल्याने आम्ही यावर विविध पर्याय शोधले आहेत. गॅसचा वापर कमी करण्यावर आम्ही भर देत आहोत. थाळीत आम्ही भजी, बटाटा वडा, पापड असे तळलेले पदार्थ देणे बंद केले आहे, तर आम्ही इंडक्शनचाही वापर सुरू केला आहे. तसेच, डिझेल शेगड्या वापरण्यासाठीही आम्ही प्रयत्न करत आहोत.
आमच्याकडे काही दिवस पुरेलइतकाच गॅसचा पुरवठा आहे. त्यामुळे आम्ही गॅसचा वापर कमी करून विविध पर्याय शोधले आहेत. इंडक्शनसह आम्ही शेगड्यांचा वापर सुरू केला आहे. पंजाबी खाद्यपदार्थ, थालीपीठ असे काही पदार्थ देणे बंद केले आहे. लवकरात लवकर गॅसपुरवठा सुरळीत व्हावा, त्यासाठी त्वरित पावले उचलली जावीत.
भाऊ सणस, गिरिजा हॉटेल