Health Camp Pudhari
पुणे

Pune District Health Camps: त्रास नसला तरी आरोग्य तपासणी करा! पुणे जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत आरोग्य शिबिरे

मधुमेह, उच्च रक्तदाब आणि रक्तक्षयाचे लवकर निदान करण्यावर भर; ग्रामीण भागात गावाजवळच तपासणी, औषधोपचार आणि वैद्यकीय सल्ल्याची सुविधा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कोणताही त्रास जाणवत नसला, तरी मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारखे आजार शरीरात बळावत असू शकतात. हे आजार वेळेत ओळखून उपचार सुरू करता यावेत, यासाठी जिल्हा परिषद पुणेच्या आरोग्य विभागाने सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना गावाजवळच तपासणी, वैद्यकीय सल्ला आणि पुढील उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्यवर्धिनी केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये ही शिबिरे घेतली जात आहेत.

शिबिरांमध्ये रक्तदाब, रक्तातील साखर, हिमोग्लोबिन, वजन, उंची आणि शरीर वस्तुमान निर्देशांकाची (बीएमआय) तपासणी केली जात आहे. विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर असंसर्गजन्य आजारांचे लवकर निदान करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. महिलांमधील रक्तक्षय तसेच ज्येष्ठ नागरिकांमधील दीर्घकालीन आजार शोधण्यासाठीही विशेष प्रयत्न केले जात आहेत.

नागरिकांना मार्गदर्शन

तपासणीत आरोग्यविषयक समस्या आढळल्यास केवळ अहवाल देऊन थांबण्याऐवजी संबंधितांना औषधोपचार, वैद्यकीय सल्ला, पुढील तपासण्या आणि गरजेनुसार उच्चस्तरीय रुग्णालयांत उपचारासाठी संदर्भ सेवा दिली जात आहे. नागरिकांना योग्य आहार, नियमित व्यायाम, व्यसनमुक्ती आणि वैयक्तिक स्वच्छतेबाबतही मार्गदर्शन केले जात आहे. ग्रामीण नागरिकांना तपासणीसाठी दूरवर जावे लागू नये, यासाठी स्थानिक पातळीवर शिबिरांचे नियोजन केले आहे. आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि स्थानिक यंत्रणांच्या मदतीने नागरिकांपर्यंत माहिती पोहचवली जात आहे.

शिबिरांतील तपासण्या

  • रक्तदाब आणि रक्तातील साखर

  • हिमोग्लोबिन तपासणी

  • वजन, उंची आणि बीएमआय

  • आवश्यकतेनुसार पुढील तपासण्या आणि वैद्यकीय सल्ला

  • गरजेनुसार औषधोपचार आणि उच्चस्तरीय रुग्णालयांत संदर्भ सेवा

त्रास नसला तरी आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष करू नये. वेळेत निदान झाल्यास योग्य उपचार करणे शक्य होते. नागरिकांनी शिबिरांचा लाभ घ्यावा.
डॉ. रामचंद्र हंकारे, जिल्हा आरोग्य अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT