

भोर: रायगड जिल्ह्यातून पुणेच्या दिशेने मोटारीतून व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) घेऊन जाणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेत ५ कोटींचा मुद्देमाल भोर पोलिसांनी वन विभागाच्या ताब्यात दिला. ही कारवाई रविवारी (दि. ११) रात्री २.३० च्या सुमारास घडली. याबाबत वनरक्षक के. एम. हिमोणे यांनी फिर्याद दिली. इकबाल दाऊद पठाण (वय ७२, रा, म्हसळा), मोहम्मद रहीमसाब बागवान (वय ३६), किरण नरेश हेदुकर (वय ३६), अभिजित अशोक हेदुकर (वय ३६), नीलेश नरेश हेदुकर (वय ३९, सर्व रा.बोर्ली, ता. श्रीवर्धन, जि. रायगड) अशी संशयितांची नावे आहेत.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या महाड नाक्यावर पोलिसांची नाकाबंदी सुरू असताना कार (एमएच ४६ टी ८६००) , कार (एम एच ०४ एफ एफ ००७५) ची तपासणी करीत असताना संशयतांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी वाहनांची कसून तपासणी केली असता त्यात ५ किलो वजनाची व्हेल माशाची उलटी असलेली प्लास्टिकची पिशवी आढळली. वरील संशयित व्हेल माशाची उलटीची तस्करी करणार असल्याचे समोर आले.
भोरचे पोलिस निरीक्षक नीलेश माने, हवालदार धर्मवीर खांडे, अभय बर्गे, अजय साळुंखे, हेमंत भिलारे, उमेश गायकवाड, पोलिस मित्र यांनी ही कारवाई केली. संशयितांना पुढील कारवाईसाठी वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले.
पुणे उपवनसंरक्षक अभिजित वायकोस, सहाय्यक वनसंरक्षक शीतल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत, वनपाल रोहन इंगवले, वनरक्षक के.एम.हिमोणे, संदीप शिवले, समीर जाधव, सुभाष गायकवाड यांनी मुद्येमालासह संशयितांना ताब्यात घेतले. याप्रकरणी वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने संशयास्पद पदार्थांची अवैध खरेदी-विक्री, साठवणूक व वाहतूक रोखण्यासाठी वन विभाग आणि पोलिस समन्वयाने कार्यवाही करीत आहेत. आरोपीनी तीन दिवसाची वन कोठडी देण्यात आली आहे, असे वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत यांनी सांगितले.