

कोंढवा: कोंढवा परिसरात सध्या वाहतूक कोंडीचा अक्षरशः कहर झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एनआयबीएम आणि साळुंखे विहार रस्त्यांवर रात्री साडेदहा वाजेपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. यामुळे वाहनचालक, स्थानिक रहिवासी आणि कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या परिस्थितीत वाहतूक पोलिस नेमके कुठे आहेत, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
कोंढवा परिसरातील अनेक रस्त्यांवर अनधिकृत व्यावसायिकांनी बस्तान मांडल्याने वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रस्त्याच्या कडेला होणारे व्यवसाय, अतिक्रमणे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या बाबींवर महापालिका प्रशासनाने प्रभावी कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
वाहतूक कोंडी ही केवळ गैरसोयीची बाब राहिलेली नसून, नागरिकांच्या मौल्यवान वेळेचा अपव्यय करणारी गंभीर समस्या बनली आहे. रुग्णवाहिका किंवा अन्य आपत्कालीन वाहनांना अशा कोंडीतून मार्ग काढताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहतूक नियोजनाचा अभाव, रस्त्यांवरील अतिक्रमणांबाबतची कथित उदासीनता आणि प्रभावी देखरेखीचा अभाव यामुळे नागरिकांना रोजच या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
रात्री उशिरापर्यंत नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत असेल, तर वाहतूक नियोजन आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. कोंढवा परिसरातील नागरिकांना मोकळे रस्ते आणि सुरळीत वाहतूक हा मूलभूत नागरी हक्क मिळणार तरी कधी? संबंधित विभागांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
आश्वासने नकोत, कारवाई करा...
कोंढव्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी केवळ आश्वासने नकोत, तर प्रशासनाने प्रत्यक्ष रस्त्यांवर उतरून कारवाई करावी, वाहतूक पोलिसांनी गर्दीच्या ठिकाणी नियमित बंदोबस्त ठेवावा, वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी आणि महापालिकेने अनधिकृत व्यवसाय व अतिक्रमणांविरोधात नियमानुसार कठोर पावले उचलणे गरजेचे असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.
कोंढवा परिसरातील वाहतूक कोंडीच्या समस्या सोडविण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून कायमस्वरूपी उपाययोजना होताना दिसत नाहीत. वाहतूक कोंडीमुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना वेळेवर पोहोचता येत नाही, तर कार्यालयातून घरी परतणाऱ्या नागरिकांनाही विलंब होतो. रात्रीच्या वेळी आबालवृद्धांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे.
अनिता पाटील, रहिवासी, कोंढवा
कोंढवा परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक विभागाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. मात्र, रस्त्यांवरील वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहनांच्या वाहतुकीसाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अतिक्रमणे हटविण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यासाठी वाहतूक पोलिसांकडून आवश्यक तो बंदोबस्त उपलब्ध करून दिला जाईल.
माया देवरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोंढवा वाहतूक विभाग