Rashtravadi Bhavan Pudhari
पुणे

Deccan Sugar Technology Land Scam: पुण्यात 300 कोटींचा घोटाळा? डेक्कन शुगर संस्थेच्या जागेवर राष्ट्रवादी कार्यालयावर गंभीर आरोप

आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभारांचा दावा; महारेराकडून प्रकल्प स्थगित, सखोल चौकशीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन ही 1936 मध्ये स्थापन झालेली संस्था आहे. या संस्थेच्या पुण्यातील शिवाजीनगर येथील 15 हजार स्क्वेअर फूट जागेवर 63 हजार स्क्वेअर फुटांचे बांधकाम करून इमारत उभी राहिली आहे. याठिकाणी संबंधित जागेवर पुणे राष्ट्रवादी काँग््रेासचे आलिशान कार्यालय नुकतेच उभे राहिले आहे. याच इमारतीत तब्बल 300 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कुंभार म्हणाले, धर्मादाय आयुक्तांकडून डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन या संस्थेला त्यांची जागा भाड्याने देण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवून कल्पवृक्ष प्लांटेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला साठ वर्षांच्या कराराने ही जागा भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. ही जागा विक्री करण्याचा कोणताही अधिकार नसताना संबंधित कंपनीने या जागेवरील सहा मजले परस्पर विक्री करून 300 कोटी पेक्षा अधिकचा गैरव्यवहार केला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन या संस्थेची जागा विकसित करण्यासाठी संस्थेने साहिल प्रधान या व्यक्तीला पॉवर एटर्नी दिली.

हा साहिल प्रधान तोच आहे जो मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात अमेडिया कंपनी आणि शीतल तेजवानी यांच्यात जो करार झाला त्या व्यवहारांत साक्षीदार आहे. यातून पार्थ पवार यांचा या प्रकरणातील सहभाग दिसून येतोय. या जागेसाठी निविदा प्रक्रिया राबवताना दौंड शुगर लिमिटेड, जय ॲग््राोटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि कल्पवृक्ष प्रायव्हेट लिमिटेड या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधितच तीन कंपन्यांचे टेंडर आले. त्यापैकी कल्पवृक्ष यांना अंतिम निविदा देण्यात आली.

कल्पवृक्ष प्लांटेशन या कंपनीने ही जागा विकसित केली. कल्पवृक्ष प्लांटेशन कंपनीचे संचालक आणि खासदार सुनेत्रा पवार या इतरही कंपन्यांमध्ये एकत्रित संचालक आहेत. ही जागा भाडे तत्वावर 60 वर्षाच्या कराराने दिली गेली. भाड्याने जागा दिल्यावर त्यावर बँकेचे कर्ज काढता येत नाही परंतु या जागेवर 25 कोटींचे कर्ज काढले गेले. सन 2017 पासून या जागेवर बांधकाम सुरू करण्यात आले आणि नुकतेच या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाचे त्याठिकाणी आलिशान कार्यालय सुरू झाल्यावर याबाबत कायदेशीर माहिती काढली असता धक्कादायक माहिती समोर आली. कल्पतरू प्लांटेशन कंपनी यांनी भाडे तत्वावर घेतलेल्या जागेचा काही भाग परस्पर विक्री केला आहे. त्यामुळे याबाबत सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.

प्रकल्प स्थगित ठेवण्याचे रेराचे आदेश

कुंभार म्हणाले, बेनामी कंपन्या स्थापन करून त्या माध्यमातून ठरावीकच संचालक सर्व कंपन्यांमध्ये नेमले जातात आणि अशा प्रकारे गैरव्यवहार केला जात आहे. महारेरा यांनी देखील या जागेची संबंधित प्रकरणाची दखल घेऊन हा प्रकल्प स्थगित ठेवण्यात यावा, असे सांगितले आहे. प्रकल्पाचे बँक खाते गोठवण्यात आले असून प्रवर्तकांनी प्रकल्पाचे अनुपालन पूर्ण करेपर्यंत प्रवर्तकास खरेदी सोबत साठे करार आणि विक्री करार करण्यास मनाई करण्यात आली आहे. कल्पवृक्ष यांनी ‌‘अनंत वन‌’ हा प्रकल्प या ठिकाणी उभा केला असून शासनाच्या विरोधात लढणाऱ्या कंपनीच्या प्रकल्पांमध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या पक्षाचे कार्यालय असणे कितपत योग्य आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास केला जावा, अशी आमची मागणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT