Ganesh Kale Murder Case Pudhari
पुणे

Ganesh Kale Murder Case: सहा महिन्यांपासून सुरू होता कट! आंदेकर टोळीचा गणेश काळेवर हल्ला यशस्वी

कारागृहातूनच दिली होती सुपारी; सकाळपासून ठेवली पाळत, दुपारी केला ‘गेम’ – पोलिस तपासात धक्कादायक उघड

पुढारी वृत्तसेवा

पुणेः आंदेकर टोळीने गणेश काळेच्या खुनाची फिल्डिंग गेल्या सहा महिन्यांपूर्वीच लावली होती. मात्र आंबेगाव पठार परिसरात सोमनाथ गायकवाड याच्या घराच्या रेकीचा प्रकार समोर आल्यानंतर नियोजन फसले होते. अखेर शनिवारी (दि.१) दुपारी संधी मिळताच अमन शेख, अरबाज पटेल आणि त्याच्या साथीदारांनी गणेश काळेचा गेम केला. त्यासाठी शनिवारी सकाळी आठ वाजेपासून गणेश याच्यावर पाळत ठेवली होती. त्यानंतर दुपारी चार वाजता संधी मिळताच त्याचा खून केल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.  (Latest Pune News)

गणेश काळे हा माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनातील आरोपी समीर काळे याचा भाऊ आहे. याच समीर याने वनराजच्या खुनात वापरलेली पिस्तुले मध्य प्रदेशातून आणली होती. तर तो प्रत्यक्ष वनराज यांचा खून करताना होता. त्याने देखील वनराज यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या; परंतु त्याच्याकडून मिस फायर झाले होते. त्यामुळे तो आंदेकर टोळीच्या रडारवर होता. अखेर टोळीने त्याचा भाऊ गणेश याचा खून केला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी बंडू आदेकर, कृष्णा आंदेकर, स्वराज वाडेकर, अमीर खान, अमन शेख, अरबाज पटेल, मयूर वाघमारे यांच्यासह नऊ जणांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

आंदेकर टोळीवर आणखी एक मोक्का- अमितेश कुमार

गणेश काळे खूनप्रकरणी आंदेकर टोळीवर आणखी एक मकोका लावण्यात येणार आहे. या टोळीवर अगोदरच तीन मकोका आहेत अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

नंबरकारी, समर्थकही आता रेकॉर्डवर

आंदेकर टोळीचे समर्थक आणि नंबरकारी मोठ्या प्रमाणात आहेत. या सर्वांना रेकॉर्डवर घेण्यात येणार आहे. त्यांच्या रिलचे चाहतेही पोलिसांच्या रडारवर आहेत. या सर्वांचे रीतसर रेकॉर्ड तयार करून सराईत गुन्हेगारांप्रमाणेच त्यांची नियमित झाडाझडती घेण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे यांनी सांगितले.

कारागृहातून वाजली खुनाची सुपारी

याबाबत बोलताना गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले, गणेश काळेच्या खुनात महत्वाची भूमिका बजावली ती स्वराज वाडेकर याने, तर गणेशच्या खुनाची सुपारी कोंढव्यातील गुन्हेगारीत प्रभाव असलेल्या अमीर खान याने कारागृहातून वाजवली आहे. यासाठी त्याने त्याचा शूटर अमन शेख याची निवड केली. मात्र हे दीर्घकालीन प्लॅनिंग पोलिसांच्या नजरेतून कसे सुटले? हा खरा प्रश्न उपस्थित होत आहे.

आखाडेच्या खुनात अमीर कारागृहात

अमीर खानची टोळी कोंढव्यात कार्यरत असली तरी ती आंदेकर टोळीचाच एक भाग आहे. स्वराज वाडेकरच्या जवळची ही पोरं असल्याचे पोलिस सांगतात. अमीर सध्या निखिल आखाडे खून प्रकरणात कोल्हापूर येथील कारागृहात आहे. तेथे अमन शेखने त्याची भेट घेतली होती. तेव्हा अमीरने अमनला बंडूअण्णा, वाडेकर भाऊने दिलेली सुपारी काहीही करून वाजवायची असा आदेश दिला होता. त्यासाठी वाडेकर याने मध्य प्रदेशातून शखा आणण्यासाठी पैशाची सोय करून दिली. यासाठी अमन शेख आणि अरबाज पटेल यांनी मुख्य भूमिका बजावली. तर अल्पवयीन मुलांनी रेकीचे काम केले. त्यांनी गणेशवर सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी तीनपर्यंत पाळत ठेवली होती. मात्र अल्पवयीन मुलांचा अदिकर टोळीशी थेट संबंध नव्हता; परंतु तोडफोडीचे काही गुन्हे त्यांच्यावर आहेत. संधी मिळताच गणेशवर एकूण नऊ गोळ्या झाडण्यात आल्या, त्यातील सहा गोळ्या त्याला लागल्याची प्राथमिक माहिती आहे, तर आरोपी मयूर वाघमारे याने कटासाठी सर्व जुळवाजुळव केली होती. त्याचा प्रत्यक्ष सहभाग नसला, तरी पडद्यामागे त्याने आपली भूमिका निभावली असल्याचे पोलिस सांगतात.

वनराज यांच्या खुनाप्रमाणेच खून ?

सोमनाथ गायकवाड टोळीने वनराज यांचा २०२४ मध्ये उदयकांत अदिकर चौकात खून केला होता. सुरूवातीला वनराज यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. त्यानंतर त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले होते. तर गणेश काळे याचा देखील खून अशाच पद्धतीने करण्यात आला आहे. त्याच्यावर अगोदर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. त्यानंतर कोयत्याने वार करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT