

पुणे : शहरातील वाढत्या वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी आणि रस्त्यांवरील बेशिस्त वाहन उभारणे थांबविण्यासाठी पुणे महानगरपालिका व वाहतूक पोलिस विभाग संयुक्तपणे पुढाकार घेत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील पाच प्रमुख रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’ योजना राबविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रकल्प विभागाचे अधीक्षक अभियंता दिनकर गोजारे यांनी दिली.(Latest Pune News)
या योजनेअंतर्गत लक्ष्मी रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, विमाननगर, बाणेर हायस्ट्रिट, आणि बिबवेवाडीतील स्वामी विवेकानंद रस्ता या पाच ठिकाणी ‘पे अँड पार्क’ सुविधा सुरू होणार आहे. शहरातील प्रमुख चौक आणि रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याबरोबरच, बेशिस्त पार्किंगमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचेही गोजारे यांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या सभागृहाच्या अस्तित्व काळातच या योजनेला सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली होती, मात्र अंमलबजावणी रखडली होती. आता प्रशासनाने ती पुन्हा मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, दुचाकीसाठी तासाला 4 रुपये, तर चारचाकीसाठी तासाला 20 रुपये दर निश्चित करण्यात येणार आहे. लक्ष्मी रस्त्यावर केवळ दुचाकी पार्किंगचे नियोजन करण्यात आले असून, हा रस्ता अरुंद आणि एकेरी असल्याने त्यास जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांवरही ‘पे अँड पार्क’ची व्यवस्था केली जाणार आहे. उर्वरित रस्त्यांवर ठराविक अंतराने पार्किंग झोन तयार केले जातील. त्याठिकाणी सीसीटीव्ही देखरेख, स्पष्ट फलक, आणि स्ट्रीट फर्निचरची सुविधा करण्यात येणार आहे.