

पुणे : शहरातील टोळीयुद्ध कोल्हापूरमधील कळंबा कारागृहाच्या वेशीवर तर पोहचले नाही ना? असा सवाल आता निर्माण झाला आहे. कारागृहातील सर्कल क्रमांक-7 च्या पूर्वेकडील 4 नंबरच्या स्वच्छतागृहात झडतीदरम्यान पिस्तुलाचे जिवंत काडतूस सापडले. याप्रकरणी मोक्कातील कैदी सुरेश बळीराम दयाळू आणि अमीर ऊर्फ चंक्या असिर खान या दोघांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.(Latest Pune News)
अमीर खान ऊर्फ चंक्या हा पुण्यातील आंदेकर टोळीचा सदस्य आहे. निखिल आखाडेच्या खुनात तो सध्या कळंबा कारागृहात बंदी आहे. शनिवारी (दि. 1) दुपारी पुण्यातील कोंढव्यात गणेश काळे याचा आंदेकर टोळीने खून केला. गणेश हा वनराज आंदेकर खुनातील आरोपी समीर काळे याचा भाऊ आहे. गणेशच्या खुनात कळंबा कारागृहातून अमीर खान याने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे पोलिस सांगतात. खान याच्यावर याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच आता त्याच्याकडे थेट कारागृहातच पिस्तुलाचे काडतूस मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सर्वांत गंभीर प्रकार म्हणजे कारागृहाची सुरक्षा भेदून हे काडतूस कारागृहात आणण्यात आले आहे. दरम्यान, काडतूस आले तर पिस्तूल देखील आतमध्ये आणण्याची तयारी अमीर खानने केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. त्यामुळे कळंबा कारागृहात आंदेकर टोळीच्या टार्गेटवर कोण? असा देखील सवाल आता निर्माण झाला आहे.
शनिवारी (दि. 1) काडतूस सापडल्यानंतर दोन दिवसांनी सोमवारी (दि. 3) गुन्हा दाखल झाला. या घटनेने कारागृहातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काडतूस सापडल्याने कैद्यांकडे पिस्तूल असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याअनुषंगाने जुना राजवाडा पोलिसांकडून कारागृह आणि कैद्यांची झडती सुरू आहे.
जुना राजवाडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कारागृहातील सुभेदार उमेश शामू चव्हाण (वय 52, रा. कळंबा, कोल्हापूर) हे सहकाऱ्यांसह शनिवारी दुपारी एकच्या सुमारास कारागृहातील सर्कल क्रमांक 7 ची झडती घेत होते. त्या वेळी 4 नंबरच्या स्वच्छतागृहात एका प्लास्टिकच्या पिशवीत लपविलेले जिवंत काडतूस त्यांना मिळाले. त्यांनी याची माहिती वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्यांना दिली. अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत संबंधित काडतूस मोक्कातील कैदी सुरेश दयाळू आणि अमीर ऊर्फ चंक्या खान यांनी लपविल्याची माहिती मिळाली.
याबाबत सुभेदार चव्हाण यांनी सोमवारी (दि. 3) सकाळी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी चार तास कारागृहाची झडती घेऊन काही कैद्यांची चौकशी केली. मात्र, कारागृहात काडतूस कसे आले? ते कोणी आणले? कधी आणले? याचा उलगडा अद्याप झालेला नाही. दोन दिवसांत या प्रकरणाचा उलगडा होईल, अशी माहिती निरीक्षक झाडे यांनी दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमीर ऊर्फ चंक्या खान याने कारागृहातील काही कैद्यांना हाताशी धरून पिस्तूल कारागृहात आणण्याची योजना आखली होती. त्यानुसार पिस्तूल पुण्यातून कोल्हापुरात मागविण्यात आले. मात्र, तिघांपैकी एक कैद्याने ही माहिती कळंबा कारागृह प्रशासनाला दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित कैद्यांची झाडाझडती घेतली. त्या वेळी या दोघांकडे पिस्तुलाचे काडतूस मिळून आले. कारागृह प्रशासनाला पिस्तुलाची चाहूल लागताच काहागृहापर्यंत आलेले पिस्तूल परत पुण्याकडे पाठवून देण्यात आले असावे, असा देखील कयास लावला जातोय. पुण्यात मागील वर्षभरापासून आंदेकर आणि सोमनाथ गायकवाड, कोमकर यांच्यात खुनाचे सत्र सुरू आहे. सप्टेंबर 2024 मध्ये माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा सोमनाथ गायकवाड टोळीने खून केला. त्याला साथ दिली ती आंदेकरांचे नातेवाईक कोमकर कुटुंबीयांनी. वनराजच्या खुनाचा बदला म्हणून आंदेकर टोळीने गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याचा खून केला. त्यानंतर आता याच टोळीने गणेश काळे याचा खून केला आहे.
कळंबा कारागृहातील दोन कैद्यांकडे पिस्तुलाचे काडतूस मिळून आले आहे. त्यातील अमीर खान नावाचा कैदी पुण्यातील आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
संजीवकुमार झाडे, पोलिस निरीक्षक, जुना राजवाडा पोलिस ठाणे, कोल्हापूर