Pune Civic Issues Pudhari
पुणे

Pune Civic Issues: पुणेकरांच्या तक्रारींचा पाढा वाढतोय; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त

खड्डे, उघड्या तारा, गटारे, पाणीगळती… शहरभर समस्यांचा स्फोट; ‘तिसरा डोळा’ बनतायत पुणेकर

पुढारी वृत्तसेवा

शहराची लोकसंख्या जशी वाढत आहे. तसा महापालिका कर्मचाऱ्यांवरचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच गत चार वर्षापासून महापालिकेत प्रशासकराज असल्याने नागरिकांच्या तक्रारीना कुणी वाली राहिलेला नाही. शहरातील गटर, मीटर, वॉटरचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर प्रलंबित राहत आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी महापालिकेची कामे सुरू असतात. मात्र, त्याची सूचना त्या भागातील नागरिकांना दिली जात नाही. काम चालू रस्ता बंदची पाटी दिसली तर ते कळते. गल्ली बोळात अशी असंख्य कामे सुरू आहेत. रस्त्यांवर पालिकेचे भले मोठे पाइप, केबल पडून आहेत. त्यामुळे रात्री आणि पहाटे अंधारातून प्रवास करताना या भागात मोठ्या अपघाताचा धोका आहे. नागरिक याच्या तक्रारी करून थकले आहेत.

या केबल कोण उचलणार?

टिळक रस्त्यावर पुरम चौकाजवळ सिलाई शोरूम समोरच्या पदपथांवर असे भले मोठे वायरचे ढीग पडून आहेत. रात्रीच्यावेळी इथे धोका आहे. त्यामुळे तेथून चालायचे कसे.

-एक नागरिक

सारसबागेचे प्रवेशद्वार अंधारात...

सारसबागेच्या प्रवेशद्वारापाशी पहाटेच्या वेळी कायम अंधार असतो. हे महापालिकेला अनेक वेळा कळवले आहे. मात्र, त्याची दखल घेती जात नाही. या ठिकाणी दररोज भल्या पहाटे गर्दी असते. त्यामुळे सर्वच नागरिकांची गैरसोय होते. सध्या तेथे बालोत्सव सुरू आहे. तेथे पहाटे उजेडाची व्यवस्था असावी.

- रत्नाकर चांदेकर, सदाशिव पेठ

इथे रस्त्यावर पाणी वाहत आहे...

शिवाजीनगर भागातील हवामान विभागाच्या सिमला ऑफिस समोरील मुख्य जलवाहिनीवर बसविलेला एअर व्हॉल्वमधून पाणी वाहत आहे. व्हॉल्व त्वरित दुरुस्त करून देखभालीसाठी सुरक्षित लोखंडी झाकण असणारे चेंबर महापालिका प्रशासनन अथवा मेट्रोकडून बांधणे गरजेचे आहे.

- विठ्ठलराव ठाकर पाटील, शिवाजीनगर

तळजाईकडे दुर्लक्ष...

या इमारतीतून कचरा वन विभागाच्या हद्दीत सारखा टाकला जातो. मात्र, वन विभाग केवळ कागदी घोडे नाचवत आहे. वन विभागाच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर डावीकडे शंभर मीटर वर भिंतीला लागून इमारत आहे. तेथून हा कचरा टाकला जातो. अनेकदा श्रमदानातून इथे स्वच्छता केली जाते. मात्र, इमारतीमधील लोक घाण करत आहेत. जबर दंड केल्यास आळा बसू शकेल.

- जागरूक नागरिक

मोझे कॉलेजजवळील रोडवरच्या तारा दुरुस्त करा

पाषाण भागातील मोझे महाविद्यालयाजवळ रस्त्यावरच अशा विजेच्या तारा तुटून खाली आल्या आहेत. या तारा नीट न बसवल्याने अशी धोकादायक स्थिती आहे. तारांवर काठ्यांचे तुकडे जोडले आहे.

- प्रकाश माळी, पाषाण

इथे होते वाहतूक कोंडी ...

पिंपरी बीजखाली खड्डे असल्यामुळे दररोज सामान्य नागरिकांना खूप त्रास होतो. सतत वाहतूक कोंडी होते. याकडे आमदार, खासदार, पालकमंत्री लक्ष देतील का?

- शाहूराज मोरे, नागरिक, पुणे

ड्रेनेजचे चेंबर जागोजागी फुटले...

महापालिकेने ड्रेनेज चेंबर दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. मात्र, अनेक ठिकाणी असे चेंबर सतत फुटलेले दिसत आहे. महापालिकेने युद्धपातळीवर हे दुरुस्तीचे काम करावे.

- रुपेश केसेकर

‌‘तिसरा डोळा‌’ पुणेकरांचा...

तुम्हाला पुण्यात फिरताना, रोजचं जगणं जगताना अनेक गोष्टी खटकत असतात. कुठं सिग्नल बंद पडल्यानं वाहतुकीचा खोळंबा झालेला असतो, तर कुठं रस्ताभर खड्डेच खड्डे पडलेले असतात... या गोष्टी चव्हाट्यावर आल्या, म्हणजे तुमच्या आवडत्या ‌‘पुढारी‌’त प्रसिद्ध झाल्या, तर त्याला तोंड फुटू शकतं आणि महापालिका-सरकारी यंत्रणा हलू शकते. तुम्ही एवढंच करायचं... अशा अडचणीच्या गोष्टीचा फोटो किंवा फोटो काढता येत नसेल, तर संबंधित तक्रार चार ओळीत लिहून ‌‘पुढारी‌’ला 9923931807 (फक्त व्हॉट्सॲप करावे) या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सॲप करायची. वाचकांनी मांडलेले असे प्रश्न ‌‘पुढारी‌’ दर आठवड्याला मांडणार आहे. चला तर मग... उचला मोबाईल आणि हा नंबर सेव्ह करून ‌‘पुढारी‌’ला आपल्या अडचणी पाठवत राहा...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT