पुणे : फेसबुकवर झालेल्या ओखळीतून कॅम्प परिसरातील एका नामांकित मिठाई विक्रेत्याला हनीट्रॅपद्वारे ब्लॅकमेल करून खंडणी उकळणाऱ्या महिलेला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. स्नेहा मोहीत कदम (वय 30, रा.सांगली) असे तिचे नाव आहे. याबाबत 45 वर्षांच्या मिठाई विक्रेत्याने फिर्याद दिली आहे.(Latest Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व्यावसायिक यांचे लक्ष्मी रोडवर सोन्या मारुती चौकात मिठाईचे दुकान आहे. फेसबुकवर त्यांची स्नेहा कदम या महिलेशी ओळख झाली. ओळखीनंतर एकदा तिने त्यांच्याकडे 24 सप्टेंबर रोजी 4 हजार रुपये मागितले. त्यांनी गुगल पेवर 4 हजार रुपये पाठविले. त्यानंतर 25 सप्टेंबर रोजी तिने फोन करून कोरेगाव पार्क येथील एका हॉटेलवर फिर्यादींना बोलवले. रात्री साडेबारा वाजता दोघे हॉटेलबाहेर भेटले. त्यानंतर स्नेहा हिने कॉफी पिणार का असे विचारले. आता इतक्या रात्री कोठे कॉफी मिळणार असे फिर्यादीने म्हटल्यावर, तिने मी आता बहिणीच्या घरी हिंजवडीला जाते, असे सांगितले. इतक्या रात्री कशी जाणार, आज येथेच हॉटेलमध्ये रहा असे म्हणून फिर्यादीने तिचे हॉटेलचे बुकिंग केले.
दरम्यान, हॉटेलच्या रुममध्ये गेल्यावर तिने दारू पिणार का असे फिर्यादींना विचारले असता, त्याला त्यांनी नकार दिला. त्यानंतर तिने फिर्यादींना शरीरसंबंध ठेवणार का, असे देखील विचारले. फिर्यादींनी त्याला देखील नकार देऊन ते आपल्या घरी निघून आले. स्नेहा हिने या वेळी फिर्यादींकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. दुसऱ्या दिवशी फिर्यादी दुकानात असताना, आरोपी महिला स्नेहा तेथे आली. तिने हॉटेलमध्ये झालेल्या प्रकाराची भीती दाखवून दुकानात तमाशा करेल, असे म्हणून धमकावले. फिर्यादींनी प्रकरण मिटविण्यासठी तिला 70 हजार रुपये दिले.
तिने दुकानातील गल्ल्यातील पैसे व मिठाईचे बॉक्स जबरदस्तीने घेऊन गेली. त्यानंतर 3 ऑक्टोबर रोजी तिने हे प्रकरण मिटवायचे असेल तर 2 लाख रुपये दे, अशी मागणी केली. सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून व्यावसायिक फिर्यादीने पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी तिला पकडण्यासाठी साध्या वेशात दुकानाच्या परिसरात सापळा रचला. मात्र, पोलिस असल्याची चाहूल लागताच तिने तेथून काढता पाय घेतला. प्रत्यक्ष न भेटता तिने गुगल पेद्वारे दोन लाख रुपये फोन करून मागितले. फिर्यादींनी तिला पंचवीस हजार रुपये पाठवून दिले.
अशा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
स्नेहा कदम फिर्यादीच्या दुकानाकडे आली असता, तिला पोलिस असल्याचा संशय आला. तिने त्यांचा फोटो काढून नदीपात्रात चारचाकी गाडीत थांबलेल्या आपल्या पतीला पाठवला. त्याने खात्री करून स्नेहा हिला ते पोलिस असल्याचे सांगताच, तिने तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर तिने फोन करून फिर्यादींकडे दोन लाखांची मागणी केली. दरम्यान, तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी तिचा ठिकाणा शोधून काढला. त्यावेळी ती नदीपात्रात असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.
ब्लॅकमेल करून पैशांची मागणी करणाऱ्या महिलेच्या त्रासाला कंटाळून व्यावसायिकाने फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून महिलेला ताब्यात घेतले असून, तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.शीतल जाधव, सहायक पोलिस निरीक्षक, फरासखाना