

Pune Municipal Election 2025 final Ward Structure
पुणे : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठीची अंतिम प्रभागरचनेला राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली असून, ही प्रभाग रचना शनिवारी जाहीर करण्यात आली. प्रारूप प्रभागरचनेवर नोंदविण्यात आलेल्या तब्बल ५ हजार ९२२ हरकतींपैकी १ हजार ३२९ पूर्णत: मान्य तर ६९ हरकती अंशत: मान्य करण्यात आल्या आहेत. ४ हजार ४२४ हरकती फेटाळण्यात आल्या आहेत. अंतिम प्रभागरचनेत आठ प्रभागांची नावे बदलण्यात आली आहेत. अंतिम प्रभागरचनेत एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल होण्याची ही पहिलीच वेळ असून, या बदलांमुळे 'कही खुशी कही गम' असे वातावरण इच्छुकांमध्ये दिसून येत आहे. आता सर्वांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे लागले आहे.
महापालिकेची प्रारूप प्रभागरचना जाहीर करण्यात आली होती. या वर्षी महापालिका निवडणूक चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीनुसार होणार आहे. एकूण १६५ नगरसेवक निवडले जाणार आहेत. प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर ४ सप्टेंबरपर्यंत नागरिकांकडून हरकती मागविण्यात आल्या होत्या. तब्बल ५९२२ हजार हरकती निवडणूक आयोगाला प्राप्त झाल्या होत्या. हरकतींवरील सुनावणी दरम्यान नैसर्गिक हद्दी न पाळल्याचे, प्रभागांची मनमानी मोडतोड केल्याचे आरोप करण्यात आले होते.
आयएएस अधिकारी व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली प्रारूप रचनेवरील हरकती व सूचनांवर सुनावणी होऊन त्याचा अहवाल हा नगरविकास विभागाकडून राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला होता. अंतिम प्रभागरचनेत काही प्रभागांमध्ये बदल करत त्यांची नावे देखील बदलली आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांना काही अंशी दिलासा तर हरकत घेणाऱ्यांच देखील समाधान निवडणूक आयोगाने केले आहे.
प्रभागनिहाय झालेले बदल?
निवडूक आयोगाने शनिवारी जाहीर केलेल्या अंतिम प्रभागरचनेमध्ये प्रभाग क्रमांक १८ वानवडी - साळुंके विहार या प्रभागाचा शिंदे वस्तीचा भाग प्रभाग क्रमांक १४ कोरेगाव पार्क - घोरपडी- मुंढवा या प्रभागाला जोडला आहे. प्रारूप रचनेत शिंदे वस्ती रस्त्याचे विभाजन करण्यात आले होते. प्रभाग क्रमांक १४ कोरेगाव पार्क - घोरपडी - मुंढवाचा मगरपट्टा सिटी रस्त्याच्या समोरील भाग हा प्रभाग क्रमांक १७ रामटेकडी- माळवाडी- वैदुवाडीला जोडण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक २० बिबवेवाडी - महेश सोसायटी या प्रभागाचे नावही बदलले असून बिबवेवाडी- शंकर महाराज मठ असे करण्यात आले आहे. या प्रभागातील के. के.मार्केट येथील पुण्याई नगर हा भाग प्रभाग क्रमांक ३८ बालाजी नगर - आंबेगाव - कात्रज या प्रभागाला जोडला आहे. प्रभाग क्रमांक ३४ नऱ्हे - वडगाव बुद्रुक - आंबेगावचा दाभाडी हा भाग पाच सदस्यीय प्रभाग ३८ बालाजीनगर - आंबेगाव- कात्रज या प्रभागाला जोडला आहे. कोळेवाडी ,जांभूळवाडी हा भाग देखील प्रभाग क्रमांक ३८ बालाजी नगर- आंबेगाव - कात्रजला जोडला आहे. प्रभाग क्रमांक ३८ बालाजी नगर - आंबेगाव - कात्रजमधील सुखसागरनगरचा भाग प्रभाग ३९ अप्पर सुपर - इंदिरानगरला जोडण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक १५ मांजरी बुद्रुक- केशवनगर- साडे सतरा नळी मधील थिटे वस्तीचा भाग प्रभाग क्रमांक ४ खराडी - वाघोलीला जोडण्यात आला आहे. याच प्रभागातून सर्वाधिक हरकती नोंदवण्यात आल्या होत्या.
अंतिम प्रभागरचनेत बदलण्यात आलेली प्रभागांची नावे
प्रभाग क्रमांक १ : कळस - धानोरी- लोहगाव उर्वरित (कळस - धानोरी).
प्रभाग क्रमांक १४ - कोरेगाव पार्क - घोरपडी - मुंढवा (कोरेगाव पार्क - मुंढवा)
प्रभाग क्रमांक १५ - मांजरी बुद्रुक- केशवनगर- साडेसतरा नळी ( मांजरी बुद्रुक- साडेसतरा नळी)
प्रभाग क्रमांक १७ - रामटेकडी - माळवाडी- वैदुवाडी (रामटेकडी- माळवाडी)
प्रभाग क्रमांक २० - शंकर महाराज मठ - बिबवेवाडी (बिबवेवाडी - महेश सोसायटी)
प्रभाग क्रमांक २४ - कसबा गणपती - कमला नेहरू हॉस्पिटल - के.ई .एम. हॉस्पिटल (कमला नेहरू हॉस्पिटल - रास्ता पेठ)
प्रभाग क्रमांक २६ - घोरपडे पेठ- गुरुवार पेठ - समताभूमी (गुरुवार पेठ - घोरपडे पेठ)
प्रभाग क्रमांक ३८ - बालाजी नगर - आंबेगाव - कात्रज (आंबेगाव - कात्रज)
या प्रभागांमध्ये झालेत बदल
महापालिकेच्या १६५ नगरसेवकांसाठीच्या ४१ प्रभागाच्या प्रारूपावर ५ हजार ९२२ हरकती आल्या होत्या. यापैकी ४,५२४ हरकती फेटाळण्यात आल्या आहेत तर १३२९ हरकती पूर्णतः व ६९ हरकती अंशतः मान्य करण्यात आल्या आहेत. प्रभाग क्रमांक १ ,४ ,१४ ,१५ ,१७, १८ ,२०, २४, २७, ३४, ३८ व ३९ या प्रभागांमध्ये बदल झाले आहेत.