पुणे : शहरातील मध्यवर्ती भागातील प्रतिष्ठित बालगंधर्व रंगमंदिरातील मोफत पार्किंग बंद करून एका ठेकेदाराला हे पार्किंग देण्यात आले होते. मात्र, ही सुविधा फक्त रंगमंदिरात येणाऱ्या प्रेक्षकांसाठी असतानाही घोले रस्त्यावरील एका हॉटेल व्यावसायिकाने ठेकेदाराला ’मॅनेज’ करून आपला फायदा करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड आला होता. असे असतानाही महापालिकेने यावर कारवाई करण्याएवजी केवळ नोटिसा देण्याचा खेळ सुरू ठेवला आहे. या ठिकाणी अजूनही हॉटेलची पार्किंग होत असल्याच्या तक्रारी असून, कारवाई कधी करणार असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे.(Latest Pune News)
शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रतिष्ठित बालगंधर्व रंगमंदिरात दररोज विविध सांस्कृतिक, राजकीय व साहित्यिक कार्यक्रमांची रेलचेल असते. नाटक, लावणी, पुरस्कार सोहळे ते पुस्तक प्रकाशनापर्यंत अनेक कार्यक्रम येथे होत असल्याने रंगमंदिर नेहमीच गजबजलेले असते. नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने रंगमंदिराच्या आवारात पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
गेल्या चार वर्षांपर्यंत हे पार्किंग मोफत होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी महापालिकेने हा ठेका एका खासगी ठेकेदाराला दिला आहे. या ठेकेदारांकडून येथे येणाऱ्या नागरिकांकडून सशुल्क पार्किंग आकारले जात आहे. मात्र, ही सुविधा फक्त रंगमंदिरात येणाऱ्या प्रेक्षकांना देणे बंधनकारक असतांनाही घोले रस्त्यावरील एका हॉटेल व्यावसायिकाने या ठेकेदाराला मॅनेज करून आपला फायदा करून घेत हॉटेलमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या गाड्या बालगंधर्व रंगमंदिरांच्या पार्किंगमध्ये लावले जात असल्याचा प्रकार उघड झाला होता.
त्यानंतर महापालिकेने संबंधित ठेकेदाराला नोटीस बजाविली. मात्र, याला काही दिवस उलटूनही महापलिकेने संबंधित ठेकेदारांवर नोटिस देण्यापालिकडे कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. या निष्क्रियतेमुळे महापालिकेच्या नोटीशीला फक्त दिखावा म्हणावे का? असा प्रश्न उपस्थित करत नागरिकांनी नोटीसचा खेळ सुरू असल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला आहे.
बालगंधर्व रंगमंदिरातील पार्किंगचा ठेका दिलेल्या ठेकेदाराला नोटीस पाठली आहे. ठेकेदाराचा खुलासा आलेला आहे. नेमके त्याचे काय म्हणणे आहे, हे तपासले जाईल. चुकीचे असल्यास हा ठेका रद्द करण्यात येईल.
नवल किशोर राम, आयुक्त, महापालिका