

Pune Rangat Sangat Pratishthan
पुणे : कलेनेच मला पैसा, मान, सन्मान मिळवून दिला. सातत्यपूर्ण रियाज, तालमी, कष्ट यात मी कधीच मागे हटले नाही. मंचावर लावणी, वगनाट्य, लोककला सादर करताना त्यातील घरंदाजपणा, शालीनता जपली. पण, आजच्या काळात ठराविक कलावंतांमुळे लावणीचा दर्जा घसरला आहे, अशी खंत ज्येष्ठ अभिनेत्री - नृत्यकलाकार जयमाला इनामदार यांनी शनिवारी (दि.4) व्यक्त केली.
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे जयमाला इनामदार यांच्या अभिनय-नृत्य कारकिर्दीस ६५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यावेळी सन्मानाला उत्तर देताना त्या बोलत होत्या. पूना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद आडकर, काव्य विभागाच्या कार्याध्यक्ष मैथिली आडकर उपस्थित होते.
इनामदार म्हणाल्या, मला लहानपणापासूनच नृत्याची विशेष आवड होती. मी कोणाकडेही नृत्य न शिकता माझ्यातील कला जोपसत गेले. कलेशिवाय मी जगू शकत नाही. घरातील अडचणींमुळे मी या कलेला व्यवसाय म्हणून स्वीकारले. यातूनच परदेशातही सादरीकरण करण्याची संधी मिळाली.
डॉ. मोरे म्हणाले, कला हे संस्कृतीचे अंग आहे. लोकनाट्य, वगनाट्य, लावणी, चित्रपट अशा सांस्कृतिक क्षेत्रात सर्वच कलाकारांचे मोठे योगदान आहे. ही संस्कृती, कलांचे जतन व्हावे व तिचा अस्सलपणा रसिकांपर्यंत पोहोचावा तसेच लावणी सारख्या लोककलांचे चाललेले विकृतीकरण थांबवावे याकरिता प्रयत्न होणे आवश्यक आहेत. जयमाला इनामदार यांनी एकलव्याच्या भूमिकेतून कलेचे शिक्षण घेत स्वत:चे व्यक्तिमत्व स्वत: घडविलेले आहे.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात 'लावण्य'या विषयावर लावण्यांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. वैजयंती आपटे यांनी सूत्रसंचालन केले.