BJP Pudhari
पुणे

Pune BJP Corporators Dispute Resolved: भाजप नगरसेविकांमधील वाद मिटला; बिडकरांची मध्यस्थी यशस्वी

गैरसमजातून निर्माण झाला वाद; बाणेर प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर चर्चा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: भाजपच्या विद्यमान आणि माजी नगरसेविकांमध्ये झालेला वाद अखेर मिटल्याचा दावा सभागृहनेते गणेश बिडकर यांनी शुक्रवारी केला. तिऱ्हाईत व्यक्तींनी निर्माण केलेल्या गैरसमजातून हा वाद उद्भवला होता. मात्र, दोन्ही बाजूंतील गैरसमज दूर झाल्याने प्रकरण शांत झाल्याची माहिती बिडकर यांनी दिली.

भाजपच्या विद्यमान नगरसेविका रोहिणी चिमटे आणि माजी नगरसेविका राजश्री काळे यांच्यात बुधवारी जोरदार वाद झाला होता. या घटनेत शिवीगाळ झाल्याचेही समोर आले असून, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे पक्षात अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा रंगली होती. याप्रकरणी बिडकर यांनी चिमटे आणि काळे यांची एकत्र बैठक घेत मध्यस्थाची भूमिका घेत त्यांचा वाद मिटविला.

यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बिडकर म्हणाले, दोन्ही नगरसेविका एकमेकींना फारशा परिचित नसल्यामुळे गैरसमज वाढला आणि त्यातून वाद झाला. मात्र, आता तो पूर्णतः निवळला असून, या प्रकरणावर अधिक चर्चा होऊ नये. त्रयस्थ व्यक्तीमुळे हा वाद झाला. या वादाचा व्हायरल झालेला व्हिडीओ तपासून संबंधितांवर कारवाई करावी, अशा सूचना केल्याचे बिडकर यांनी सांगितले.

भविष्यात खबरदारी घेतली जाईल

बाणेर परिसरात आदिवासी विद्यार्थिनींसाठी उभारण्यात येणाऱ्या निवासी शिक्षण केंद्राच्या कामावरून हा वाद निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर विकासकामांमधील ‌‘टक्केवारी‌’चा मुद्दाही चर्चेत आला होता. मात्र, या प्रकरणात कोणत्याही प्रकारची टक्केवारी नसून तिऱ्हाईत व्यक्तींमुळे गैरसमज निर्माण झाल्याचा दावा बिडकर यांनी केला. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी खबरदारी घेतली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

प्रकल्पासाठी पाठपुरावा

महापालिकेकडून बाणेर येथे आदिवासी विद्यार्थिनींसाठी निवासी शिक्षण केंद्र उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, 85 ते 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामांसाठी 3 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यास स्थायी समितीची मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पासाठी माजी नगरसेविका राजश्री काळे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याची माहिती देण्यात आली. हे केंद्र लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असे देखील बिडकर म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT