पुणे: इच्छुकांची संख्या मोठी असल्याने बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने उमेदवारी यादी जाहीर करण्याऐवजी थेट उमेदवारी निश्चित झालेल्यांना निरोप देऊन कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत, तर जवळपास 35 ते 40 जागांवरील उमेदवारीचा निर्णय मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत होऊ शकलेला नाही. त्यामुळे भाजपची अंतिम यादी निश्चित होण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.
भाजपची उमेदवारी यादी निश्चित करण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची बुधवारी पुण्यात बैठक झाली. तीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील आमदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून नावे घेऊन प्राथमिक यादी निश्चित केली होती. त्यावर गुरुवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत चर्चा केली. मात्र, या बैठकीत अनेक प्रभागांमधील उमेदवार निश्चित करण्यावरून कोअर कमिटीमधील पदाधिकाऱ्यांमध्येच खडाजंगी झाल्याचे सांगण्यात आले. अखेर मुख्यमंत्र्यांनी त्यात हस्तक्षेप करीत ज्या नावांमध्ये एकमत होत नाही, त्याबाबत मी स्वत: निर्णय घेईन, असे सांगितले. त्यानुसार प्रलंबित नावांबाबत पुन्हा बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, ज्या 100 हून अधिक जागांवरील उमेदवार निश्चित झाले, त्यांची यादी जाहीर न करता त्यांना थेट शुक्रवारी उमेदवारी निश्चित झाल्याचा निरोप कोअर कमिटीमधील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आला. प्रामुख्याने इच्छुकांची संख्या मोठी असल्याने बंडखोरी अन् नाराजी टाळण्यासाठी तसेच ज्यांना उमेदवारी मिळाली नाही असे इच्छुक थेट महाविकास आघाडीकडे जाण्याची शक्यता घेऊन भाजपने उमेदवारी यादी जाहीर न करण्याचा सावध पवित्रा उचलला असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे भाजपची उमेदवारी यादी जाहीर होण्यास आणखी विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
थेट एबी फॉर्म देणार
सध्या राजकीय बैठकांना वेग आला आहे. उमेदवारी यादी जाहीर झाली, तर उमेदवार पळवापळवीची शक्यता आहे, याची भीती असल्याने भाजप आता थेट एबी फॉर्म देणार असल्याची देखील चर्चा आहे. त्यामुळे यादी जाहीर होणार का? हा प्रश्न देखील आता उमेदवारांना पडू लागला आहे.
कुटुंबातील उमेदवारीला मुख्यमंत्र्यांचा रेड सिग्नल
भाजपमधील अनेक नेत्यांच्या कुटुंबातील सदस्य उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यात राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या कुटुंबातून दोन ठिकाणी उमेदवारी मागण्यात आली आहे, तर खडकवासलाचे आमदार भीमराव तापकीर यांनी देखील त्यांचे पुतणे अभिषेक यांच्यासाठी उमेदवारी मागितली आहे.
आमदार सुनील कांबळे यांनी देखील त्यांच्या मुलीसाठी उमेदवारी मागितली आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्यास रेड सिग्नल दर्शविल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, काही माजी नगरसेवक व इच्छुक असलेल्या वादग््रास्तांना उमेदवारी दिली जाणार नसल्याचे सांगण्यात आले.
भाजपच्या अंतिम यादीची प्रतीक्षाच!
इच्छुकांची संख्या मोठी असल्याने बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने उमेदवारी यादी जाहीर करण्याऐवजी थेट उमेदवारी निश्चित झालेल्यांना निरोप देऊन कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत, तर जवळपास 35 ते 40 जागांवरील उमेदवारीचा निर्णय मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत होऊ शकलेला नाही. त्यामुळे भाजपची अंतिम यादी निश्चित होण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.